EVM मशीनचे रडगाणे गाणाऱ्या काँग्रेस; विधानपरिषदेत तरी मशीन हायजॅक झाली का? प्रवीण पोटे यांची 94.64% मतांसह ऐतिहासिक विजयाची हॅट्रिक | काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज
युवा मेलघाट न्यूज | ब्युरो टीम
अमरावती, 22 जून 2026 | विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे पाटील यांनी 390 मते घेऊन दणदणीत विजय मिळवला. त्यांनी विजयाची हॅट्रिक साधत 94.64% मतांचा विक्रम नोंदवला. या मतदारसंघात एकूण 451 मतदारांपैकी 427 सदस्यांनी गुरुवारी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 94.68% नोंदवली गेली.
मतमोजणी सोमवारी सकाळी 8 वाजता सुरू झाली. सर्वप्रथम वैध व अवैध मतांची छाननी करण्यात आली. एकूण 427 मतपत्रिकांपैकी 6 मतपत्रिका अवैध आढळल्या. त्यापैकी 5 मतपत्रिका कोऱ्या होत्या, तर एका मतपत्रिकेवर खूण आढळल्याने ती बाद करण्यात आली. 421 वैध मतांचा कोटा 211 निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत प्रवीण पोटे यांना 390 मते मिळाली व ते विजयी घोषित झाले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना भोपळाही फोडता आला नाही. त्यांना एकही मत मिळाले नाही.
निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे हर्षजित देशमुख, भाजपाचे प्रवीण पोटे व वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा हे तीन उमेदवार होते. निकालानंतर काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. EVM मशीनचे रडगाणे गाणाऱ्या काँग्रेसला विचारावे लागेल की, विधानपरिषदेत तरी मशीन हायजॅक झाली का? स्वतःच्याच उमेदवाराला मतदान न करणाऱ्या काँग्रेसचे हे कार्य गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदवावे अशि राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या निवडणुकीने अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसला स्वतःचे नगरसेवक सांभाळता आले नाहीत, ना त्यांना योग्य रणनीती आखता आली. गुप्त मतदान असताना पक्षाने व्हीप जारी करण्याचा निर्णय हास्यास्पद ठरला. तटस्थ राहण्याची भूमिका घेणे आणि पक्षाच्या उमेदवाराला मत न देणे म्हणजे संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकाराला तिलांजली देण्यासारखे आहे. निवडणुकीत जय-पराजय होत असतो, परंतु पक्षाची भूमिका व मतदारांना एकजूट ठेवणे महत्त्वाचे असते. यात जिल्ह्यातील काँग्रेस नेते पूर्णपणे अपयशी ठरले.
मागील निवडणुकीत काँग्रेसच्या 117 मतदारांपैकी फक्त 17 जणांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केले होते. यावेळी तर 96 मतदारांपैकी एकानेही काँग्रेसला मत दिले नाही. व्यक्ती नव्हे तर पक्षाची वैचारिक बाजू पाहून नगरसेवकांना निवडून देणाऱ्या मतदारांच्या तोंडावर ही चपराक आहे. त्यामुळे काँग्रेसला आत्मपरीक्षणाची नितांत गरज आहे.
दुसरीकडे प्रवीण पोटे यांचा विजय हा जिल्ह्यातील नगरसेवकांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांशी ठेवलेल्या सातत्यपूर्ण संपर्काचा परिणाम मानला जात आहे. हाच त्यांचा सर्वात मोठा प्लस पॉइंट ठरला. या निकालामुळे युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक रवी राणा व भाजप नेत्या नवनीत राणा यांचा जिल्ह्यातील राजकीय मार्ग अधिक खडतर झाला आहे. विजयानंतर प्रवीण पोटे यांनी वंचितच्या उमेदवाराला मिळालेल्या 31 पैकी 27 मते कुणाची हे सर्वांना माहीत आहे, असे सूचक विधान करून अप्रत्यक्षपणे राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे सुत्रांचे म्हणने आहे.
मेळघाटच्या राजकारणावर परिणाम: अमरावती विधानपरिषदेच्या या निकालाचा थेट परिणाम मेळघाटच्या राजकारणावर होणार आहे. प्रवीण पोटे यांच्या दणदणीत विजयाने जिल्ह्यात भाजपची पकड आणखी मजबूत झाली असून, आदिवासीबहुल मेळघाटातही पक्षाची संघटनात्मक बांधणी वाढण्यास मदत होईल. काँग्रेसच्या शून्य कामगिरीमुळे मेळघाटातील पारंपरिक काँग्रेस मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे, वंचितला मिळालेल्या 31 मतांवरून रवी राणा व नवनीत राणा यांच्या भूमिकेवरही राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मेळघाटात भाजप विरुद्ध राणा गट असा नवा समीकरण तयार होण्याची चिन्हे आहेत. एकूणच, या निकालाने मेळघाटातील सत्तेची गणिते बदलण्यास सुरुवात झाली आहे. या निकालामुळे राज्यातील आगामी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः भाजपने बहुतेक मतदारसंघांमध्ये मजबूत कामगिरी करत आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
विजयी उमेदवार: नाशिक – गोकुळ गिते (अपक्ष), सांगली-सातारा – धैर्यशील कदम (भाजप), वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर – अरुण लखाणी (भाजप), ठाणे – रवींद्र फाटक (शिवसेना-शिंदे), रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी-अजित पवार), पुणे – विक्रम काकडे (राष्ट्रवादी-अजित पवार), अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे (भाजप), नांदेड – अमर राजूरकर (भाजप), भंडारा-गोंदिया – डॉ. राजीव पोतदार (भाजप), छ. संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाठ (भाजप), परभणी-हिंगोली – सईद खान (भाजप), जळगाव – नंदकिशोर महाजन (शिवसेना-शिंदे), सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप), धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील (भाजप), अमरावती – प्रवीण पोटे (भाजप), यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना).











