धारणीत अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांचा छापा; दोन तस्कर अटकेत, ५ जनावरे सुखरूप
युवा मेलघाट न्यूज –
धारणी | पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांनी अवैध धंदे व गोवंश तस्करी विरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलीस स्टेशन धारणीच्या पथकाने ०२/१०/२०२६ रोजी मोठी कारवाई केली आहे.
पोलीस निरीक्षक श्री. अवतारसिंग चव्हाण यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, टाटा कंपनीचे वाहन क्रमांक MH 27 BX 6310 मध्ये ५ गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात आहेत. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून रात्री ०८:०० वाजताच्या सुमारास सदर वाहन ताब्यात घेतले.
तपासणी केली असता वाहनात मागील बाजूस दोराने ५ गोवंश जनावरे निर्दयतेने बांधून कत्तलीसाठी वाहतूक करताना आढळली. चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना व जनावरांच्या मालकीबाबत कोणतेही कागदपत्र नव्हते.
पोलिसांनी या कारवाईत अंदाजे ४,००,००० रुपयांचे टाटा कंपनीचे इंट्रा मॉडेलचे चारचाकी वाहन आणि १,३५,००० रुपये किमतीची ५ गोवंश जनावरे असा एकूण ५,३५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पंचनामा केला आहे.
या प्रकरणी शेख मुजाहिद अब्दुल मजीद (वय २२, रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) आणि विक्रम रवींद्र इंगळे (वय २०, रा. अंजनगाव सुर्जी) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन धारणी येथे अपराध क्र. ७४९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शेख मुजाहिद याच्यावर यापूर्वीही अशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. दत्ता तोटेवाड सा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या पथकातील सपोनि संध्या चव्हाण, पो.कॉ. जगत तेलगोटे, आदित्य सुनर व पो.कॉ. सागर कुहटकर यांनी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.








