महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान; धारणी उपविभागात ६ ऑक्टोबर आणि ८ डिसेंबर रोजी आयोजन
प्रलंबित महसूल प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
युवा मेलघाट न्यूज नेटवर्क __________________________ धारणी (जि. अमरावती), दि. ५ – राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार राज्यभरातील प्रलंबित अर्ध-न्यायिक महसूल प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी “महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान” राबविण्यात येत आहे.
हे अभियान दि. १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविले जाणार असून, या अंतर्गत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, धारणी यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, धारणी उपविभागीय कार्यालयात दि. ६ ऑक्टोबर २०२६ आणि दि. ८ डिसेंबर २०२६ रोजी महसूल लोक अदालत भरविण्यात येईल.


या लोक अदालतीमध्ये महसूल अपिले, वाद, हक्क आणि इतर तत्सम प्रकरणे उभय पक्षांच्या संमतीने व आपसी समझौत्याने निकाली काढण्यात येणार आहेत. त्यामुळे न्यायालयीन विलंब टाळून नागरिकांना त्वरित न्याय मिळणार आहे.
यासाठी ज्या पक्षकारांना आपले प्रकरण तडजोडीने मिटवायचे आहे, त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, धारणी येथे संपर्क साधून ‘प्रपत्र-अ’ (महसूल लोक अदालत तडजोडनामा अर्ज) विहित नमुन्यात सादर करावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सिद्धार्थ शुक्ला (भा.प्र.से.) यांनी केले आहे.
नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपली प्रलंबित प्रकरणे मुदतीपूर्वी निकाली काढावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








