जिल्हा समाज कल्याण विभागाच्या सेवा संकल्प अभियानात राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय पुरस्कार विजेते सुभाष येणोरकर यांचा गौरव; व्यसनमुक्तीवर प्रबोधन
युवा मेलघाट न्यूज नेटवर्क ___________________________ वर्धा, दि. ५ – जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्रीमती वानमती सी. (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कुमार अग्रवाल (भा.प्र.से.), जिल्हा पोलीस अधीक्षक वर्धा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मोहोळ, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर प्रसाद कुलकर्णी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्रीमती वैशाली रसाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय सेवा पुरस्कार २०२४-२५ प्राप्त झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुभाष येणोरकर यांचा जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती प्रतिभा भागवतकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सुभाष येणोरकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांच्या आधारे व्यसनमुक्तीचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून पोलीस उपनिरीक्षक सिनू कुमार बानोत, तुकाराम घोडे, संघपाल पाटील व नामदेव काळे महाराज यांनी मार्गदर्शन केले.
या अभियानांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली, व्यसनमुक्तीवर आधारित लघुपट दाखविण्यात आला व मान्यवरांचे प्रबोधनपर व्याख्यान झाले. कार्यक्रमाला समाज कल्याण निरीक्षक राजू मरापे, अधिकारी-कर्मचारी वर्ग, वसतिगृह अधीक्षक-अधीक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








