मंत्री अदिती तटकरे यांची मेळघाटात आरोग्य-विकास आढावा बैठक:
कुपोषण, रिक्त पदे आणि बालमृत्यू हे मोठे आव्हान, IMR आणि संस्थात्मक प्रसूतीत मात्र लक्षणीय घट
युवा मेलघाट न्यूज
धारणी | शनिवार, २५ जुलै २०२६ | टिम ब्युरो
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मेळघाट दौऱ्यादरम्यान धारणी येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य आणि महिला बालविकास विभागाचा संयुक्त आढावा घेण्यात आला. या बैठकीत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीतून मेळघाटात गेल्या काही वर्षांत आरोग्य निर्देशांकात सुधारणा झाली असली तरी मनुष्यबळाची कमतरता, कुपोषण आणि बालमृत्यू ही आव्हाने कायम असल्याचे स्पष्ट झाले.
कुपोषण निर्मूलन: धारणी-चिखलदरा अजूनही चिंतेचा विषय
जून 2026 च्या आकडेवारीनुसार अमरावती जिल्ह्यात 0 ते 6 वर्ष वयोगटातील 1,19,124 मुलांपैकी 1,14,204 मुलांचे वजन घेण्यात आले. त्यापैकी 235 मुले SAM म्हणजे गंभीर कुपोषित आणि 3,038 मुले MAM म्हणजे मध्यम कुपोषित आढळली. जिल्ह्यातील एकूण 3,273 कुपोषित मुलांपैकी 68 टक्क्यांहून अधिक मुले ही धारणी आणि चिखलदरा या दोनच तालुक्यात आहेत.
धारणी तालुक्यात 94 SAM आणि 1,361 MAM अशी एकूण 1,455 मुले तर चिखलदरा तालुक्यात 52 SAM आणि 737 MAM अशी एकूण 789 मुले कुपोषित आहेत. मात्र सकारात्मक बाब म्हणजे मेळघाटातील SAM चे प्रमाण कमी होत आहे 2023-24 मध्ये मेळघाटात 383 SAM होते ते जून 2026 मध्ये 146 वर आले आहेत.
NRC आणि VCDC अंतर्गत उपचार सुरू आहेत. धारणी NRC मध्ये 67 पैकी 41 मुले 61 टक्के दराने बरी झाली आहेत. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख अमृत आहार योजने अंतर्गत धारणी आणि चिखलदरा मिळून 3,476 पैकी 3,169 गर्भवती आणि स्तनदा मातांना लाभ देण्यात आला आहे.
बालमृत्यू आणि सिकलसेल: अजूनही मोठे आव्हान
नवसंजीवनी योजने च्या 2025-26 च्या अहवालानुसार मेळघाटात 0 ते 6 वर्ष वयोगटातील 139 बालकांचा मृत्यू झाला आहे. यात धारणीतील 98 आणि चिखलदऱ्यातील 41 बालकांचा समावेश आहे. 0 ते 1 वर्षातील मृत्यू 92 असून त्यापैकी 59 मृत्यू जन्मानंतर 28 दिवसांच्या आत झाले आहेत.
दुसरीकडे राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत मेळघाटातील 3,92,172 लोकसंख्येपैकी 3,42,635 लोकांची तपासणी पूर्ण झाली आहे. यात 835 सिकलसेल रुग्ण आणि 9,029 वाहक आढळले आहेत. 505 रुग्ण Hydroxyurea उपचारावर आहेत. धारणी तालुक्यात रुग्ण आणि वाहकांची संख्या चिखलदऱ्यापेक्षा अधिक आहे.
IMR-MMR मध्ये ऐतिहासिक घट, संस्थात्मक प्रसूती 96.75 टक्के
बैठकीतील सर्वात सकारात्मक आकडेवारी म्हणजे IMR, MMR आणि SBR मधील घट. 2011-12 मध्ये मेळघाटातील IMR 41 होता तो 2025-26 मध्ये 14.3 वर आला आहे. हा गेल्या 15 वर्षातील सर्वात कमी दर आहे. MMR 233 वरून 77 वर आणि SBR 22 वरून 9 वर आला आहे. 2025-26 मध्ये 5 मातामृत्यू नोंदवले गेले.
मिशन 28 : अंतर्गत संस्थात्मक प्रसूती वाढविण्यावर भर देण्यात आला. त्याचे फळ म्हणून 2025-26 मध्ये झालेल्या 6,557 प्रसूतींपैकी 6,344 म्हणजे 96.75 टक्के प्रसूती संस्थात्मक झाल्या. घरी होणाऱ्या प्रसूतींचे प्रमाण 17.49 टक्क्यांवरून 3.24 टक्क्यांवर आले आहे.
मनुष्यबळाची मोठी टंचाई: महिला बालविकास विभागात 130 पदे रिक्त
महिला बालविकास विभागातील मनुष्यबळाअभावी योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे. जिल्ह्यात CDPO चे 1, पर्यवेक्षिकांची 35, अंगणवाडी सेविकांची 37 आणि मदतनीसांची 95 अशी एकूण 130 पदे रिक्त आहेत. पर्यवेक्षिकांची 35 टक्के पदे रिक्त असल्याने अंगणवाड्यांच्या देखरेखीवर थेट परिणाम होत आहे. आरोग्य विभागातही CHO ची 85 पैकी 35, MO Gr.A ची 14 पैकी 3 पदे रिक्त असल्याची माहिती सादर करण्यात आली. जिल्ह्यातील 2,592 अंगणवाड्यांपैकी 1,929 च्या स्वतःच्या इमारती आहेत. उर्वरित 663 अंगणवाड्या भाड्याच्या किंवा शाळेच्या खोलीत भरतात.
महिला आणि बाल संरक्षण: केसेस वाढल्या
One Stop Centre / सखी केंद्र मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या केसेस वाढत आहेत. 2022-23 मध्ये 94 असणाऱ्या केसेस 2025-26 मध्ये 191 पर्यंत पोहोचल्या आहेत. गेल्या 4 वर्षात एकूण 615 केसेस हाताळल्या. 2025-26 मध्ये 176 महिलांना कायदेशीर आणि 111 पीडित महिलांना निवारा देण्यात आला. मात्र केंद्रात 9 पैकी 4 पदे रिक्त आहेत.
चाईल्ड हेल्पलाईन च्या जानेवारी ते मार्च 2026 च्या अहवालानुसार अमरावती शहरात 86 प्रकरणे नोंदवली गेली. त्यात कौटुंबिक संकट 20, संरक्षण 18 आणि हरवलेली मुले 15 प्रकरणे आहेत.
इतर योजना आणि जनजागृती
PMMVY योजने अंतर्गत जिल्ह्याचे लक्ष्य 13,394 असून 5,800 नोंदी पूर्ण झाल्या आहेत. लेक लाडकी योजने अंतर्गत 16,754 पैकी 13,756 मुलींना लाभ मिळाला आहे. बालसंगोपन योजने अंतर्गत 11,102 लाभार्थींना मदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात 6,291 जनजागृती कार्यक्रमांद्वारे 7,09,860 नागरिकांपर्यंत पोहोचण्यात आले. 41,481 नागरिकांनी महिलांवरील अत्याचार आणि कुपोषण विरोधी प्रतिज्ञा घेतली आहे.
मंत्री अदिती तटकरे यांचा आढावा बैठक YouTube विडियो पहा
मंत्री अदिती तटकरे यांचे निर्देश:
आकडेवारीचा आढावा घेतल्यानंतर मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “1993 पासून मेळघाटाला लागलेला कुपोषणाचा कलंक पुसण्यासाठी आता समन्वयाने काम करावे लागेल. रिक्त पदे तातडीने भरा, मिशन 28 ची काटेकोर अंमलबजावणी करा आणि प्रत्येक कुपोषित मूल, गर्भवती माता आणि सिकलसेल रुग्णापर्यंत शासन पोहोचले पाहिजे. One Stop Centre आणि चाईल्ड हेल्पलाईन अधिक बळकट करा.” मंत्रींनी आरोग्य, महिला बालविकास आणि प्रशासनाला एकत्रितपणे काम करण्याचे आणि 2026-27 पर्यंत मेळघाटाला कुपोषणमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आदेश दिले.








