मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

आनंदाची दिवाळी कुठे हरवली? प्रत्येक भारतीयाच्या मनातला प्रश्न:

---Advertisement---

आनंदाची दिवाळी कुठे हरवली? प्रत्येक भारतीयाच्या मनातला प्रश्न: आपल्या चाहत्या व हितचिंतका कडून दिपावलीच्या शुभेच्छा संदेश बघा एकाच ठिकाणी

युवा मेलघाट न्यूज नेटवर्क : लहानपणीची दिवाळी आठवली की डोळ्यासमोर तोच चित्रपट येतो – अंगणात रांगोळी, घरात फराळाचा सुगंध आणि दारात फटाक्यांची आतषबाजी. मग तुम्ही उत्तर प्रदेशातले असा, महाराष्ट्रातले असा, बंगाल किंवा तामिळनाडूतले असा, त्या दिवाळीचा आनंद सगळीकडे सारखाच होता. आज आपल्याकडे सगळं आहे, पण तो निरागस, निखळ आनंद मात्र कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय. हा प्रश्न आज प्रत्येक घरात विचारला जातोय, आनंदाची दिवाळी कुठे गेली?

आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्यच हेच आहे की आपला एकही सण एकट्याचा नाही. दिवाळी, होळी, ईद, बैसाखी, पोंगल, ओणम – प्रत्येक सणाचा आत्माच एकत्र येण्यात आहे. पाडवा पती-पत्नीचा, भाऊबीज बहीण-भावाचा, रक्षाबंधन विश्वासाचा. सण म्हणजे कुटुंबाला, समाजाला एकत्र बांधणारा धागा. जेव्हा आपण या धाग्यापासून तुटतो, तेव्हा सणाचे फक्त फोटो उरतात, भावना नाही.

आठवा ती सुट्टी लागल्यावरची दिवाळी. शाळा बंद झाल्या की आम्ही सगळे आजोळी किंवा आमच्या मोठ्या घरी जायचो. कधी गावच्या वाड्यात, कधी शहरातल्या चाळीत, कधी छोट्या फ्लॅटमध्ये. पण आनंद सारखाच. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच काम – किल्ला बनवणे, घर सजवणे. आज बाजारात रेडिमेड किल्ले, प्लास्टिकचे मावळे, चायनीज लायटिंग मिळते, पण त्या वस्तूंना आपल्या हाताचा स्पर्श नाही, आपल्या आठवणींचा वास नाही.

आम्ही स्वतः माती आणायचो, विटा जमवायचो, पाणी कालवून चिखल बनवायचो आणि त्या चिखलाने छोटा किल्ला, छोटं घर, छोटी दिवाळी उभी करायचो. कोणी मातीचे दिवे बनवायचे, कोणी कागदाचे आकाशकंदील. हात कपडे खराब व्हायचे, आई ओरडायची, पण त्या ओरड्यातही प्रेम असायचं. आज मुलं मोबाईलवर किल्ल्याचा फोटो बघतात, पण त्या चिखलातल्या हातांचा आनंद त्यांना कधीच कळणार नाही.

तेव्हाचं घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हत्या. आजी-आजोबा, पणजी, आई-बाबा, काका-काकू, आत्या, मामा आणि सगळी भावंडं मिळून १५-२० माणसं एका छताखाली. शेजारीही आपलेच वाटायचे. उत्तर भारतात हवेली, महाराष्ट्रात वाडा, मुंबईत चाळ, दक्षिणेत अंगणवाडी – नावं वेगळी पण आत्मा एकच. ४०-५० माणसं एकत्र दिवाळी साजरी करायची. आज ३ बीएचके फ्लॅटमध्ये ३ माणसं राहतात आणि तरीही प्रत्येकजण एकटा आहे.

धनत्रयोदशीला बाबांसोबत बाजारात जाणं हा एक सोहळाच असायचा. खिशात कमी पैसे असायचे पण पिशवी भरून फटाके, पणत्या, रांगोळीचे रंग यायचे. लहान मुलांसाठी फुलझडी, मोठ्यांसाठी लक्ष्मीपूजनाचं सामान. त्या गर्दीत बाबांचा हात घट्ट धरून चालण्यात जी सुरक्षितता वाटायची, ती आज ऑनलाईन शॉपिंगमध्ये कुठे मिळणार?

नरक चतुर्दशीची पहाट आजही अनेकांच्या लक्षात असेल. पहाटे ३-४ वाजल्यापासून घरात आंघोळीची गडबड सुरू व्हायची. सगळ्यात आधी आजोबा, मग वडीलधारी माणसं. आणि आम्ही लहान मुलं त्या आंघोळीच्या आधीच उठून फटाके फोडायला तयार. तेल-उटणं लावून केलेली आंघोळ म्हणजे राजेशाही थाट असायचा. आज आपण गीझरच्या पाण्याने एकटेच आंघोळ करतो आणि इंस्टाग्रामवर स्टोरी टाकतो.

त्या आंघोळीनंतर मंदिरात जाणं, मशिदीत जाणं, गुरुद्वारात जाणं – आपापल्या श्रद्धेनुसार पण एकत्र जाणं. रस्त्याभर फटाके फोडत, एकमेकांना भेटत, शुभेच्छा देत जाणं. आज आपण सकाळी उठून फक्त व्हॉट्सअॅपवर १०० लोकांना एकच मेसेज फॉरवर्ड करतो. समोरासमोर भेटून “शुभ दिवाळी” म्हणण्यात जो ओलावा आहे, तो फॉरवर्ड मेसेजमध्ये नाही.

मंदिरातून, दर्शन घेऊन आल्यावर घरात जी फराळाची ताटं वाढली जायची, ती आठवा. चिवडा, लाडू, चकली, शंकरपाळे, करंजी, अनारसे, शेव, गुलाबजाम, बालूशाही – प्रत्येक राज्यात नाव वेगळं पण चव तीच – घरच्या हातची. एकही पदार्थ बाहेरून विकत आणलेला नसायचा. सगळ्या घरच्या बायकांनी मिळून ८ दिवस आधीपासून बनवलेला फराळ. त्या एका मोठ्या ताटात २० जणांनी हात घालून खाण्यात जो आनंद होता, तो आज स्वीट मार्टच्या महागड्या डब्यात नाही.

संध्याकाळचं लक्ष्मीपूजन हे प्रत्येक घराचं हृदय होतं. वडीलधारी माणसं पूजा सांगून आल्यावर घरची पूजा व्हायची. सगळं कुटुंब एकत्र बसायचं. मुलं कंटाळायची पण तरीही बसायची, कारण त्यानंतर गच्चीवर जाऊन फटाके फोडायचे असायचे. त्या पूजेत पैशाची प्रार्थना कमी आणि एकत्र राहण्याची प्रार्थना जास्त असायची.

दुसऱ्या दिवशी पाडवा, गोवर्धन पूजा, विश्वकर्मा पूजा. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या नावाने पण एकच भावना – निसर्गाबद्दल कृतज्ञता. शेतकरी आपल्या बैलांची पूजा करायचा, व्यापारी आपल्या हिशोबाच्या वह्यांची, कारागीर आपल्या अवजारांची. हा सण फक्त लक्ष्मीचा नव्हता, तर श्रमाचा, कष्टाचा सन्मान होता.

आणि मग भाऊबीज, भैया दूज. बहीण आपल्या भावाची वाट बघायची. लग्न होऊन दूर गेलेली मुलगी माहेरी यायची. मामाच्या गावी, बहिणीच्या घरी २५-३० माणसं पुन्हा एकत्र यायची. हा सण भावाच्या रक्षणाचा आणि बहिणीच्या मायेचा. आज बहीण कुरिअरने राखी पाठवते, भाऊ ऑनलाईन पैसे पाठवतो, पण त्या भेटीतला हुंदका कुठे हरवला?

खरं सांगायचं तर पूर्वी पैसा कमी होता पण हौस आणि वेळ भरपूर होता. आहे त्या पैशात लोक मनसोक्त सण साजरे करायचे. आज पैसा आहे पण वेळ नाही, माणसं नाहीत. मोठ्या सोसायटीत हजारो दिव्यांची लायटिंग आहे पण घरात अंधार आहे. आपण खूप प्रगती केली, बिल्डिंग उंच झाल्या, पण मनं छोटी झाली.

म्हणूनच आज बीपी, शुगर, डिप्रेशन वाढले आहे. पूर्वी लोक मनातलं बोलून मोकळे व्हायचे. एकत्र बसून हसायचे, रडायचे, भांडायचे पण पुन्हा एकत्र यायचे. मन हलकं व्हायचं. आज आपण ५०० मित्र फेसबुकवर जोडतो पण मनातलं सांगायला एकही खांदा जवळ नसतो. आपण गर्दीतही एकटे झालो आहोत.

या दिवाळीत एक छोटा प्रयत्न करूया. मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवून आपल्या माणसांच्या डोळ्यात बघूया. मुलांना पुन्हा मातीत खेळू द्या, हाताने किल्ला बनवू द्या. शेजाऱ्याला घरी बोलावून एकत्र फराळ खाऊया. कारण दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा सण नाही, तर विझलेल्या नात्यांना पुन्हा पेटवण्याचा सण आहे. चला, या वेळी अशी दिवाळी साजरी करूया की पुढच्या पिढीला सांगता येईल, की खरी दिवाळी म्हणजे लाईटची नाही, तर माणुसकीची असते.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

युवा मेलघाट न्यूज़: सोमवार 16 नोव्हेंबर 2026

दिपावली 2026 विशेष अंक _युवा मेलघाट न्यूज: रविवार 8 नोव्हेंबर 2026

भाजपा जिल्हा मेळघाट मध्ये आध्यात्मिक सेलवर मोठी जबाबदारी, पंडित सूर्यप्रकाशजी मिश्रा यांची जिल्हा संयोजक पदी नियुक्ती

धारणीत युवा स्वाभिमानचा एल्गार; झेडपीसाठी एकही जागा नाही मिळाली तर पाचही जागा स्वबळावर लढवून जिंकणार – राजकुमार मालवीय यांचा निर्धार

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजितदादा गट) धारणी शहर अध्यक्षपदी विवेक प्रकाश धनेवार यांची नियुक्ती; पाणी पुरवठा सभापतींवर शहर अध्यक्षाची नवी जबाबदारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

Leave a Comment