काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर गैरहजर, युवक काँग्रेसच्या तक्रारीनंतर आरोग्य विभागाची धावपळ
मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, 5 ऑगस्टपर्यंत मागितला लेखी खुलासा
युवा मेलघाट न्यूज नेटवर्क _______________________ चिखलदरा. मेळघाटच्या दुर्गम भागातील आरोग्य सेवा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती टेकाडे यांच्या सततच्या गैरहजेरीच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. भारतीय युवक काँग्रेसने या संदर्भात लेखी तक्रार केल्यानंतर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
युवक काँग्रेसने केली लेखी तक्रार
भारतीय युवक काँग्रेस मेळघाट विधानसभा अध्यक्ष पियुष मालविय यांनी दिनांक 01.08.2026 रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी चिखलदरा यांना पत्र क्र. 21/2026 द्वारे तक्रार सादर केली. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. स्वाती टेकाडे या वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत. मात्र रुजू झाल्यापासून त्या वेगवेगळ्या कारणांनी वेळोवेळी गैरहजर राहत आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. मेळघाटात साथरोग आणि गंभीर रुग्णांची संख्या वाढलेली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागावर कामाचा अतिरिक्त ताण आहे. अशा वेळी वैद्यकीय अधिकारीच कर्तव्यावर उपस्थित नसणे ही गंभीर बाब आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, जर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कातकुंभ येथे सेवा देण्यात रस नसेल तर त्यांच्यावर योग्य कार्यवाही करावी. तातडीने त्यांना कार्यमुक्त करून त्यांच्या जागी कामात रस असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करावी. अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील कोणत्याही गावात साथ पसरल्यास किंवा वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्यास त्याला सर्वस्वी आरोग्य विभाग जबाबदार राहील.


तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस
युवक काँग्रेसच्या तक्रारीची दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी चिखलदरा डॉ. महेंद्र नाडे यांनी तातडीने कार्यवाही केली. त्यांनी 01.08.2026 रोजी डॉ. स्वाती टेकाडे यांना “कारणे दाखवा नोटीस” दिली आहे. नोटीसमध्ये उल्लेख आहे की, आपल्या विरोधात सदर पदावर रुजू झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने वेळोवेळी गैरहजर राहता अशी तक्रार प्राप्त झाली आहे. यापूर्वीही आपण आठवड्यातून फक्त दोन दिवस सेवा देता अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर परिस्थितीमुळे काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार विस्कळीत होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची प्रतिमा देखील मलिन होत आहे असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
5 ऑगस्टपर्यंत मागितला खुलासा
डॉ. टेकाडे यांना या नोटीसीला उत्तर म्हणून दिनांक 05.08.2026 पर्यंत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र खुलासा अपूर्ण किंवा असमाधानकारक आढळल्यास प्रकरण वरिष्ठ कार्यालयात सुनावणीसाठी पाठवण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. ही नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती, जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी धारणी यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.
मेळघाटच्या आरोग्यावर परिणाम
कातकुंभ आणि परिसरातील 20 हून अधिक गावांचा भार या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. पावसाळ्यात मलेरिया, डायरिया आणि सर्पदंशाचे रुग्ण वाढतात. अशा वेळी 24 तास डॉक्टरांची उपस्थिती अत्यावश्यक असते. मात्र डॉक्टरच गैरहजर राहत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे.
या प्रकरणामुळे मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. प्रशासन या प्रकरणात काय कार्यवाही करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








