अंधश्रद्धेतून मेळघाटात थरार – गोबरकहू येथे ४५ वर्षीय समोतीचा कुटुंबीयांकडूनच कोल्ड ब्लडेड प्लॅन करून खून
युवा मेळघाट न्यूज – नेटवर्क
धारणी | धारणी तालुक्यातील दुर्गम गोबरकहू गावात अंधश्रद्धेने पुन्हा एका निष्पाप आदिवासी महिलेचा बळी घेतला आहे. ४५ वर्षीय समोती रामभाऊ कासदेकर या महिलेचा तिच्याच सख्ख्या नातेवाईकांनी कट रचून निर्दयीपणे खून केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिस तपासात हा खून नसून ‘कोल्ड ब्लडेड प्रि-प्लॅन मर्डर’ असल्याचे उघड झाले आहे.
काय आहे संपूर्ण घटना?
२७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी समोती कासदेकर यांचा मृतदेह गावाजवळील शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. गळ्यातील चांदीचा तागीचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. याप्रकरणी धारणी पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी मुख्य संशयित रामलाल लक्ष्मण कासदेकर (३९) याला २८ ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता ३९ तासांची पोलिस कोठडी मिळाली होती. चौकशीत त्याने धक्कादायक कबुली दिली. “समोती जादूटोणा करते आणि त्यामुळे घरातील महिला सदस्य आजारी पडतात” या अंधश्रद्धेतून आपण हा खून केल्याचे त्याने सांगितले.
रामलालच्या कबुलीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि या कटात आणखी तिघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी अनिल छोटेलाल कासदेकर (३९) याला रविवारी तर सखाराम कासदेकर (४९) आणि रामू लक्ष्मण कासदेकर (४०) यांना सोमवारी अटक केली.
तीन दिर, एक पुतण्या – आरोपी नात्यातीलच
या खून प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सर्व आरोपी हे मयत महिलेचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत. सखाराम, रामलाल आणि रामू हे तिघे मयत समोतीचे दिर आहेत, तर अनिल हा तिचा पुतण्या आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींना समोतीच्या दैनंदिन सवयींची खडा न खडा माहिती होती. ती शेतात कधी जाते, ती कोणते कपडे घालते, ती कोणत्या वेळी एकटी असते याची पूर्ण माहिती त्यांनी काढली होती. याच माहितीचा आधार घेऊन त्यांनी २७ ऑगस्टच्या रात्री शेतात गाठून तिचा काटा काढण्याचा प्लॅन आखला.
नेमकं कारण काय? मयत समोतीचे वडील हे गावात भगताचे काम करायचे. त्यामुळे समोती सुद्धा जादूटोणा करत असावी आणि त्यामुळेच घरातील महिला वारंवार आजारी पडत आहेत, असा भ्रम आरोपी रामलालच्या मनात बसला होता. याच रागातून त्याने आपल्या दोन भावांना आणि पुतण्याला विश्वासात घेऊन तिला संपवण्याचा कट रचला.
या प्रकरणी चारही आरोपींना न्यायालयाने २ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून धारणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. जादूटोण्याच्या संशयातून नात्याचा खून झाल्याने संपूर्ण मेळघाटात हळहळ व्यक्त होत आहे.









