अमरावती जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, 3.53 लाख नावे वगळली: 30 सप्टेंबर 2026 पर्यंत नागरिकांना दावे व हरकती नोंदवता येणार
युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क
अमरावती : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती जिल्ह्यातील सर्व आठही विधानसभा मतदारसंघांची बहुप्रतिक्षित प्रारूप मतदार यादी सोमवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये 29 लाख 93 हजार 395 मतदार नोंदवले गेले आहेत.
बीएलओंच्या घरोघरी जाऊन केलेल्या गणना अर्ज वितरणात ज्यांनी गणनापत्रक बीएलओकडे जमा केले नाही, अशा 3 लाख 53 हजार 291 मतदारांची नावे या प्रारूप यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. यामध्ये 9 हजार 307 मृत, 9 हजार 64 हजार 593 कायमचे स्थलांतरित, 23 हजार 310 अनुपस्थित, 56 हजार 48 आधीच नोंदणीकृत आणि 178 इतर मतदारांचा समावेश आहे. ही यादी http://amravati.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एकत्रित नागरिक सुटणार नाही आणि एकही अपात्र समाविष्ट होणार नाही या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रारूप यादीनुसार जिल्ह्यात सध्या एकूण 11 लाख 28 हजार 83 पुरुष, 10 लाख 88 हजार 251 महिला आणि 61 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. तर एकूण मतदान केंद्रांची संख्या 2 हजार 868 वरून 2 हजार 704 झाली आहे.
आठ मतदारसंघातील स्थिती अशी
धामणगाव रेल्वे – वगळलेले 40 हजार 436, यादीतील मतदार 2 लाख 68 हजार 409
बडनेरा – 63 हजार 706, 3 लाख 10 हजार 778
अमरावती – 79 हजार 89, 2 लाख 91 हजार 604
तिवसा – 48 हजार 322, 2 लाख 48 हजार 729
दर्यापूर – 30 हजार 916, 2 लाख 69 हजार 592
मेळघाट – 34 हजार 20, 2 लाख 63 हजार 792
अचलपूर – 48 हजार 528, 2 लाख 93 हजार 289
मोर्शी – 26 हजार 489, 2 लाख 63 हजार 544
एकूण – 3 लाख 53 हजार 828 वगळले, यादीत 29 लाख 12 हजार 395 मतदार.
दरम्यान या प्रारूप यादीवर 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती नोंदवता येणार आहेत. तसेच 1 ऑक्टोबर 2026 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी नावनोंदणीसाठी फॉर्म 6 भरावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजीराव शिंदे यांनी केले आहे.








