मेळघाटात चाललंय तरी काय? ACB ची महिन्यातील तिसरी तर वर्षातील नववी कारवाई, धारणीचा PWD सहाय्यक अभियंता 2 लाख घेताना जाळ्यात
युवा मेलघाट न्यूज
धारणी दि.16/09/2026 |मेळघाटात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा भांडाफोड झाला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धारणी येथील सहाय्यक अभियंता, श्रेणी-1 ला दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने मेळघाटातील शासकीय यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
आरोपीचे नाव विनोद मकरध्वज नवघरे, वय 34 वर्षे, पद सहाय्यक अभियंता, श्रेणी-1, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धारणी, जि. अमरावती असुन. त्यांचा ह.मु. पत्ता द्वारा श्री. काळबांडे, विसावा कॉलनी, अमरावती तर मुळ पत्ता रा. बोरखेडी, पो. वेणी, ता. लोणार, जि. बुलढाणा आहे.
तक्रारदार हे पुरुष, वय 43 वर्षे, रा. कुसुमकोट खु. ता. धारणी, जि. अमरावती येथील रहिवासी असून ते बांधकाम कंत्राटदार व बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहेत. त्यांनी सन 2024-25 व 2025-26 या आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धारणी, जि. अमरावती चे कार्यक्षेत्रात महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत धारणी तालुक्यातील विविध गावातील सिमेंट काँक्रीट रस्त्यावर साहित्य पुरवठा व बांधकाम केले आहे.
त्यापैकी अंदाजे दिड कोटी रुपयाचे कामाचे देयक त्यांना माहे मार्च 2026 मध्ये प्राप्त झाले असून अंदाजे 80 लक्ष रुपयाचे देयक मिळणे बाकी आहे. सदर कामापैकी तक्रारदार यांना माहे मार्च 2026 मध्ये अंदाजे दिड कोटी रुपयाचे देयक काढून दिल्याचा मोबदला म्हणून आरोपी लोकसेवक विनोद मकरध्वज नवघरे, सहाय्यक अभियंता यांनी 7 टक्के प्रमाणे 10,50,000 रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबतची तक्रार दिली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 16/09/2026 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी यांनी तक्रारदार यांना त्यांनी केलेल्या कामाचे अंदाजे दिड कोटी रुपयाचे कामाचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून 10,50,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 9,00,000 रुपये लाच घेण्याचे मान्य केले व त्यापैकी पहिला टप्पा म्हणून 2,00,000 रुपये लाच तक्रारदार यांचेकडून स्वीकारणार असल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले.
त्यानंतर दिनांक 16/09/2026 रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष आरोपी लोकसेवक विनोद मकरध्वज नवघरे, सहाय्यक अभियंता यांनी तक्रारदार यांचेकडे मागणी केलेल्या लाच रकमेपैकी पहिला टप्पा म्हणून 2,00,000 रुपये लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून स्वतःकरीता लाच स्वीकारले वरून विनोद मकरध्वज नवघरे यांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन धारणी, जि. अमरावती येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. आरोपी याला ताब्यात घेण्यात आले असून अटक करण्याची कार्यवाही करणे बाकी आहे.
ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक श्री. रमेश ताले, ला.प्र.वि. अमरावती घटक यांनी केली असून सापळा पथकात पो.हवा. प्रमोद रायपुरे, पो.कॉ. वैभव जायले, चालक पो.कॉ. राजेश बहीरट यांचा समावेश होता. या कारवाईचे पर्यवेक्षण अधिकारी श्री. राजेश राठोड, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., अमरावतीयांनी केले तर मार्गदर्शन श्री. बापू बांगर, पोलीस अधीक्षक आणि श्री. सुनिल किनगे, अपर पोलीस अधीक्षक यांनी केले.
आता या कारवाईनंतर मेळघाटात एकच चर्चा रंगली आहे. ACB ची ही कारवाई मेळघाट मध्ये एका महिन्यात तिसरी आहे, तर वर्षात नववी आहे. मेळघाटात हे चाललंय तरी काय, असा संतप्त सवाल आदिवासी बांधव आणि नागरिकांमधून विचारला जात आहे. विकासकामांसाठी येणारा निधी बिल काढण्यासाठीच जर टक्केवारी द्यावी लागत असेल तर रस्ते, शाळा, अंगणवाड्या दर्जेदार कशा होणार. एक अधिकारी जाळ्यात अडकतो, दुसरा त्याच मार्गाने जातो. भ्रष्टाचारी सबक घेऊन सुधरणार की आणखी एकामागे एक असेच अडकले जाणार, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. लाचखोरीला आळा बसणार की ही साखळी अशीच सुरू राहणार याकडे संपूर्ण मेळघाटाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती अगर लाच मागणीचा लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
घटक कार्यालय, अमरावती, ललीत सेंटर, परांजपे कॉलनी, अमरावती, दूरध्वनी 0721-2553055, ईमेल dyspacbamt@gmail.com,
परिक्षेत्र कार्यालय 0721-2553055, spacbamrawati@mahapolice.gov.in
आणि मुख्यालय सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई – 400030, acbwebmail@mahapolice.gov.in येथे संपर्क साधावा.
______ Advertisement ____________










