पोलीस स्टेशन धारणी येथे गणरायाच्या महाप्रसादाचा भक्तिमय सोहळा थाटात संपन्न; महिला पोलिसांच्या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, SDPO माधवराव गरुड यांचे मार्गदर्शन, PI अवतारसिंह चव्हाण यांचे सक्षम नेतृत्व
युवा मेलघाट न्यूज | विशेष वृत्त ||
धारणी, ता. १७ सप्टेंबर २०२६ – गणपती बाप्पा मोरया च्या गजरात आणि ढोल-ताशांच्या निनादात पोलीस स्टेशन धारणी, जिल्हा अमरावती येथे श्री गणपती महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
महाराष्ट्र पोलीस दलाने नेहमीच कायदा व सुव्यवस्थेसोबतच सामाजिक बांधिलकी जपली आहे, याचाच प्रत्यय आज धारणी येथे आला. सकाळी ठीक ११ वाजता श्रींची आरती होऊन महाप्रसाद वाटपाला सुरुवात झाली, जी संध्याकाळ पर्यंत अविरत सुरू होती.
महाप्रसाद कार्यक्रम : पोलिस स्टेशन धारणी विडियो पहा
वरिष्ठांचे मार्गदर्शन, कनिष्ठांची अंमलबजावणी
हा संपूर्ण कार्यक्रम पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण मा. श्री. निकेतन कदम साहेब, अपर पोलीस अधीक्षक मा.श्री दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. माधवराव गरुड साहेब यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली पार पडला.
तर पोलीस स्टेशन धारणीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा. श्री. अवतारसिंह चव्हाण यांच्या खंबीर नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन धारणीच्या संपूर्ण दलाने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. या आयोजनात पोलीस निरीक्षक व सर्व अधिकारी, अंमलदार, पोलीस स्टेशन धारणी यांची उपस्थिती होती.
महिला पोलिस शक्तीचा आदर्श
या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे धारणी पोलीस दलातील महिला पोलिसांचा सहभाग. विशेष म्हणजे महाप्रसाद बनविण्यासाठी पोलीस दलातील पुरुष कर्मचाऱ्यांसोबत महिला पोलिसांनी स्वतः विशेष परिश्रम घेतले. पहाटेपासून भाजी चिरण्यापासून ते स्वयंपाक बनवणे, प्रसाद वाढणे आणि शिस्तबद्ध वाटप करणे, ही सर्व कामे महिला व पुरुष पोलिसांनी खांद्याला खांदा लावून केली. वर्दीतील या सेवाभावी रूपाचे नागरिकांनी भरभरून कौतुक केले.







पोलीस-नागरिक सुसंवादाचा उत्कृष्ट नमुना
यावेळी धारणी शहर व परिसरातील शेकडो भाविकांनी आपल्या परिवारासह हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. केवळ बंदोबस्तापुरते मर्यादित न राहता, सण-उत्सवात नागरिकांमध्ये मिसळून आपुलकी जपणाऱ्या धारणी पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
पोलीस निरीक्षक चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दाखवलेली ही एकजूट आणि भक्तिभाव इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.









