गांधिगीरी आंदोलनातून निवेदन; पात्र शेतकऱ्यांना मंजूर १०० टक्के पीककर्ज देण्याची मागणी — आठ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क _________________________ अमरावती दर्यापूर : पात्र शेतकऱ्यांना मंजूर असलेल्या पीककर्जापैकी केवळ ५० टक्के रक्कम वितरित करून उर्वरित कर्जवाटप बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त गांधीगिरी आंदोलन केले. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांना गुलाबपुष्प देत शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले. यावेळी अध्यक्षांकडून शेतकऱ्यांशी कथितरीत्या अवमानकारक भाषेत संवाद झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला असून, या प्रकाराचा निषेध करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही पात्र शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रुपये म्हणजे मंजूर पीककर्जाच्या ५० टक्के रक्कम वितरित करण्यात आली आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम अद्याप वितरित झालेली नसून, ३० सप्टेंबरपासून कर्जवाटप बंद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुष्काळी परिस्थिती, वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळणारा अपुरा बाजारभाव आणि वाढते आर्थिक संकट यामुळे पूर्ण पीककर्जाची गरज असताना कर्जवाटप बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
अध्यक्षांच्या कथित वक्तव्यावर शेतकऱ्यांचा आक्षेप
बँकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांना निवेदन दिले. यावेळी अध्यक्षांनी शेतकऱ्यांशी मग्रुरीची भाषा केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच शेतकऱ्यांना ‘वेडे’ संबोधल्याचे आणि ‘बँक शेतकऱ्यांना कर्ज देते हेच मोठे आहे’ अशा आशयाचे वक्तव्य केल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या कथित वक्तव्याचा शेतकऱ्यांनी निषेध केला.
याबाबत अमित पाटील होले व इंजी. अनिकेत वाकपांजर म्हणाले, “शेतकरी बँकेकडे कर्ज मागतो म्हणजे बँक त्याच्यावर उपकार करत नाही. सहकारी बँकिंग व्यवस्थेचा शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार पीककर्ज उपलब्ध करून देणे ही बँकेची जबाबदारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी अवमानकारक भाषा वापरणे योग्य नाही. आम्ही या भूमिकेचा निषेध करतो.”
ते पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबरोबरच त्यांच्या विचारांतील शेतकरीहित, स्वाभिमान आणि न्यायाची भूमिका व्यवहारातही दिसली पाहिजे. आज शेतकरी दुष्काळ आणि आर्थिक संकटाचा सामना करीत असताना मंजूर कर्जाच्या केवळ ५० टक्के रकमेचे वाटप करून उर्वरित कर्जवाटप बंद करणे हा गंभीर प्रश्न आहे. पात्र शेतकऱ्यांना मंजूर १०० टक्के पीककर्ज मिळालेच पाहिजे.”
संचालक मंडळाच्या निर्णयाची प्रत मागितली
कर्जवाटपाबाबत बँकेचे संचालक सुधाकर भाऊ भारसाकळे यांच्याकडे विचारणा केली असता, हा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे सांगण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जवाटप बंद करण्यासंदर्भातील संचालक मंडळाचा ठराव, निर्णयाची कारणे आणि संबंधित लेखी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच काही शेतकऱ्यांकडून सिबिलच्या नावाखाली २३६ रुपये शुल्क आकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. या शुल्काची नियमसंगतता व आकारणीचा आधार स्पष्ट करून चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली. नवीन पात्र शेतकऱ्यांचे कर्जप्रस्ताव स्वीकारून त्यांना नियमानुसार पीककर्ज उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.
आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण
पात्र शेतकऱ्यांना मंजूर १०० टक्के पीककर्जाचे वाटप करणे, बंद केलेले कर्जवाटप तातडीने सुरू करणे, नवीन पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार कर्ज उपलब्ध करून देणे, सिबिल शुल्काबाबत चौकशी करणे आणि संचालक मंडळाच्या निर्णयाची लेखी माहिती देणे या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
येत्या आठ दिवसांत या मागण्यांवर ठोस तोडगा न निघाल्यास अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांच्या कुरळ पूर्णा (ता. चांदूरबाजार) येथील निवासस्थानी शांततापूर्ण पद्धतीने आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा अमित पाटील होले, इंजी. अनिकेत वाकपांजर यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.
यावेळी अमित पाटील होले, इंजी. अनिकेत वाकपांजर, प्रमोद पाटील होले, मा. उपसरपंच अनिल पाटील होले, विजय पाटील टापरे, मा. उपसरपंच गौतम वाकपांजर, सुभाष खंडारे, नीलेश राऊत, अनिल घुरडे, अंबादास वाकपांजर, अशोक जुंबळे, मा. उपसरपंच बाळासाहेब वाकपांजर, सतीश चुडे, नागेश होले, देविदास ओलोकार, सुधाकर वाकपांजर, नंदकिशोर टापरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.










