धनंजय वानखडे सरांचा सेवापूर्ती सोहळ्यात सत्कार: भोकरबर्डी येथे नागरी व सेवापूर्ती सन्मानचिन्ह प्रदान
भोकरबर्डी, ता. धारणी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा, भोकरबर्डी येथील मुख्याध्यापक श्री. धनंजय अरविंदराव वानखडे यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक व सामाजिक सेवेनिमित्त आज नागरी व सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी वानखडे सरांचा सपत्नीक सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीपाल पाल, अध्यक्ष, खरेदी-विक्री सहकारी सोसायटी, धारणी तालुका होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती वनिता श्रीपाल पाल, माजी महिला व बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद अमरावती यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून क्रांती दहीकार, सरपंच, ब्रिजलाल मावस्कर, माजी सरपंच तसेच हरिकिशन शेलूकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना रोहित श्रीपाल पाल यांनी केली. यावेळी त्यांनी वानखडे सरांच्या जीवनातील शैक्षणिक, सामाजिक व गावासाठीच्या योगदानावर प्रकाश टाकला. सन 1992 पासून वानखडे सर भोकरबर्डी गावात कार्यरत असून, त्यांनी रोहित पाल यांना पहिलीच्या वर्गात शिकवले आहे. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच सरांनी गावातील सामाजिक व सार्वजनिक कार्यातही सातत्याने सहभाग घेतला.




रोहित पाल यांनी सांगितले की, “वानखडे सर हे केवळ माझे शिक्षक नव्हते, तर माझ्यासाठी एक चांगले राजकीय मार्गदर्शकही राहिले आहेत. गावातील कोणतेही काम असो, सर नेहमी सहभागी होत. त्यांनी कधीही आपण या गावचे नाही, अशी भावना निर्माण होऊ दिली नाही. गावातील प्रत्येक सुख-दुःखात ते सहभागी राहिले. विशेषतः स्वच्छता व साफसफाईबाबत त्यांचा नेहमी विशेष आग्रह असायचा.”
त्यांनी पुढे सांगितले की, वानखडे सरांनी आपल्या प्रदीर्घ सेवेत अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला ज्ञान, संस्कार आणि योग्य दिशा दिली असून गावाच्या सामाजिक जडणघडणीतही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा सेवापूर्ती सोहळा हा केवळ एका शिक्षकाचा सत्कार नसून, गावाच्या एका मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रसंग आहे.


यावेळी सत्कारमूर्ती श्री. धनंजय वानखडे, त्यांच्या पत्नी श्रीमती मीना वानखडे तसेच प्रयाग वानखडे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रेम मालवीय, नितेश चतुरकर, अशोक पाल, कमल साखरे, होशीलाल मालवीय, प्रदीप मावस्कर, केशव लक्ष्मण पटोकर, मनसाराम डोल्या भिलावेकर, बुडा नाटू जांभेकर, बाबूलाल मावस्कर, रामकरण धांडे, नंदलाल मावस्कर, नंदकुमार बालकराम, संतोष सावलकर, विजय मालवीय, रमेश पटोरकर, ब्रिजलाल जाबेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच बोथे सर, पारडे सर, जारी सर, गहुकर सर, हरणे सर, गुंड सर, बारड सर, चौधरी सर, तांडील मॅडम, धुप्पे सर, नीचित सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वानखडे सरांच्या प्रदीर्घ शैक्षणिक व सामाजिक सेवेला यावेळी ग्रामस्थांकडून मनःपूर्वक सलाम करण्यात आला.









