दोन लाखाच्या लाच प्रकरणानंतर धारणीच्या सिमेंट-काँक्रीट रस्त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह? विनोद नवघरे कारागृहात
युवा मेलघाट न्यूज वृत्त संकलन_________________________ धारणी | सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभाग धारणी येथील उपअभियंता विनोद नवघरे यांना २ लाख रुपयांची कथित लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांना न्यायालयीन प्रक्रियेनंतर अमरावती कारागृहात रवाना करण्यात आले आहे. या कारवाईनंतर संपूर्ण मेलघाटातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरच गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विशेषतः धारणी तालुक्यासह मेलघाटातील विविध गावांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या सिमेंट-काँक्रीट रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता आणि मोजमाप आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
एम.बी. नोंदीनंतर दहा लाखांची मागणी कशासाठी?
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार कोणत्याही कामाचे प्रत्यक्ष मोजमाप घेऊन त्याची नोंद मोजमाप पुस्तिकेत (M.B.) केली जाते आणि त्यानंतरच बिल तयार करण्याची आणि पैसे अदा करण्याची प्रक्रिया पुढे जाते.
या प्रकरणात तक्रारीत १० लाख रुपयांच्या कथित मागणीचा उल्लेख असल्याची चर्चा आहे, तर २ लाख रुपये स्वीकारताना कारवाई झाली. मग एम.बी.मध्ये मोजमाप नोंदविल्यानंतर एवढ्या मोठ्या रकमेची मागणी कोणत्या कामाच्या मोबदल्यात, कोणत्या बिलासाठी किंवा कोणत्या अधिकृत प्रक्रियेसाठी केली गेली, हा तपासाचा सर्वात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.
विकासकामांची फेरतपासणी करा – नागरिकांची मागणी
या पार्श्वभूमीवर धारणी तालुक्यातील सिमेंट रस्त्यांची फेरतपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रस्त्याची मंजूर लांबी, रुंदी आणि जाडी किती होती? प्रत्यक्षात किती बांधकाम झाले? वापरलेल्या काँक्रीटचे प्रमाण आणि दर्जा काय होता? एम.बी. मध्ये किती मोजमाप नोंदविले गेले आणि त्यानुसार ठेकेदाराला किती रक्कम अदा करण्यात आली? या सर्व बाबींची तांत्रिक आणि आर्थिक पद्धतीने चौकशी झाल्यासच वस्तुस्थिती समोर येऊ शकेल, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
एसीबीच्या कारवाईनंतर आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि मेलघाटातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे ऑडिट होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








