मेलघाटात सेंट्रल किचन पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली; पालकांच्या विरोधानंतर प्रशासन बॅकफूटवर
युवा मेलघाट न्यूज वृत्त संकलन_____________________ धारणी: टेंबली, बीजुधावडी, सुसरदा आणि सावलीखेडा येथील आदिवासी आश्रमशाळांसाठी वादग्रस्त ठरलेले सेंट्रल किचन पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. मात्र या निर्णयाला पालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविल्याने प्रशासनाला आता नमती भूमिका घ्यावी लागली आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा धारणी प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, विद्यार्थ्यांच्या पालकांची आणि स्थानिक ग्रामस्थांची सहमती घेतल्याशिवाय सेंट्रल किचन कोणत्याही परिस्थितीत सुरू केले जाणार नाही.
दोन महिन्यांपूर्वी याच सेंट्रल किचनमधून पुरवठा झालेल्या भोजनातून या चारही आश्रमशाळांमधील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. या घटनेनंतर भोजनाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित सेंट्रल किचन संचालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २६ जुलै २०२६ रोजी धारणी पोलीस ठाण्यात अधिक रिसॉर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणेचे मालक विजय सदाशिव बोभरे आणि कुणाल उडाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
आता खाद्य व औषध प्रशासनाकडून क्लीन चिट मिळाल्याच्या चर्चेनंतर हे किचन पुन्हा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र विषबाधेसारखी गंभीर घटना घडून अवघे दोन महिने झाले असताना इतक्या घाईत हा निर्णय का घेतला जात आहे, असा सवाल पालक विचारत आहेत.
मेलघाटातील शासकीय आणि खाजगी आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न थेट या भोजनाशी जोडलेला आहे. त्यामुळे पालकांचा विश्वास संपादन करणे प्रशासनासाठी अत्यंत गरजेचे आहे. मंत्रालय स्तरावरून सेंट्रल किचन योजना पुन्हा लागू करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा असली तरी, स्थानिक पातळीवर अंतिम निर्णय झालेला नाही.








