मेलघाटचे माजी आमदार पटल्या गुरुजी मावसकर यांना महाराष्ट्र विधिमंडळात श्रद्धांजली
युवा मेलघाट न्यूज़ ब्यूरो | विशेष सेवा
मुंबई/अमरावती, दि. 22 जून 2026: मेलघाट विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व ज्येष्ठ आदिवासी नेते कै. पटल्या गुरुजी मावसकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे। 15 जून 2026 रोजी वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे निधन झाले। महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली।
1 जुलै 1942 रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे जन्मलेल्या पटल्या गुरुजींचे शिक्षण एस.एस.सी. पर्यंत झाले होते। शिक्षण क्षेत्रात सेवा करीत असतानाच त्यांनी समाज कार्याला सुरुवात केली। “गुरुजी” या नावाने ते सर्वदूर परिचित होते।भारतीय जनता पक्षाचे धारणी तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना सन 1995 च्या विधानसभा निवडणुकीत मेलघाट मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले। आमदार म्हणून त्यांनी मेलघाटातील कुपोषण, रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठवला। आदिवासी विकास संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यभर आदिवासी बांधवांची सेवा केली। वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, रोजगार निर्मिती व कुपोषण निर्मूलनासाठी त्यांचा लढा अविरत सुरू होता। साधी राहणी व जनतेशी थेट नाळ जुळलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती।
विधिमंडळात श्रद्धांजली वाहताना सभापती म्हणाले, “पटल्या गुरुजी मावसकर यांनी मेलघाटसारख्या दुर्गम भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेले योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही। त्यांच्या निधनाने एक प्रामाणिक व संघर्षशील लोकनेता आपण गमावला आहे।” त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे। धारणी येथे त्यांच्यावर हिन्दू मोक्षधाम भुतेश्वर महादेव मंदिर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले।








