चिखलदराच्या सुषमा मालवीय यांना ‘सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्कार’ जाहीर; महिला सक्षमीकरण व ग्रामीण उद्योजकतेतील योगदानासाठी गौरव
युवा मेलघाट न्यूज नेटवर्क |
चिखलदरा मेळघाट | चिखलदरा येथील नंदनवन शहर उपजीविका केंद्र व स्फूर्ती क्लस्टर एसपीव्हीच्या संचालिका सुषमा मालवीय यांना कारंजा लाड येथील सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला विकास संस्थेतर्फे ‘नवोदित उद्योजिका तथा सामाजिक कार्य’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना दिनांक 24 मे 2026 रोजी कारंजा लाड येथे आमदार सईताई प्रकाश डहाके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
स्वयंरोजगारातून शेकडो महिलांना दिशा
नगरपरिषद चिखलदरा अंतर्गत स्थापन झालेल्या आणि खादी व ग्रामोद्योग आयोगाद्वारे संचालित शिवस्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून सुषमा मालवीय यांनी आतापर्यंत 60 महिला बचत गटांना उद्योजकीय प्रशिक्षण दिले आहे. वर्धा येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्थान एमगिरी येथे झालेल्या प्रशिक्षणानंतर त्यांनी हँडमेड सोप, हर्बल जडीबुटी आणि पंचगव्य या क्षेत्रात गृहउद्योग सुरू केला. स्थानिक सीएलएफच्या विक्री व प्रदर्शन दालनातून त्यांच्या उत्पादनांना पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे ग्रामीण उद्योगाला चालना मिळाली.
सन्मानासाठी निवड कशी झाली?
कारंजा लाड येथील नगरपरिषद अंतर्गत असलेल्या सीएलएफच्या सदस्यांनी चिखलदऱ्याला भेट दिली असता स्थानिक महिलांच्या कलागुणांची दखल घेतली. त्यानंतर माजी नगरसेविका तथा लघुउद्योजिका सुषमा मालवीय यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्काराबद्दल बोलताना सुषमा मालवीय यांनी या यशाचे श्रेय नगरपरिषद चिखलदराचे बचत गट समूह संघटन राजेश आटवर्धन आणि स्फूर्ती क्लस्टरचे संस्थापक सुनील भालेराव यांना दिले.
चिखलदरा कॉफीवर आधारित नवीन उपक्रम
महिलांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहून MSME मंत्रालय, भारत सरकारची यंत्रणा आणि महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्थान वर्धा यांच्यामार्फत चिखलदरा कॉफी उत्पादनावर आधारित मूल्यवर्धन प्रक्रिया व संशोधन उपक्रम स्फूर्ती क्लस्टर येथे राबविण्यात येत आहे. सुषमा मालवीय यांनी नंदनवन शहर उपजीविका संघाच्या महिला सभासदांना या प्रशिक्षणात सहभागी होऊन उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन केले आहे. या पुरस्कारामुळे मेळघाटातील महिला सक्षमीकरणाच्या कामाला नवी ऊर्जा मिळेल, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.










