रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळाल्याच पाहिजेत: अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात आमदार गजाननभाऊ लवटे यांच्या कडक सूचना, नवीन उपजिल्हा रुग्णालय दोन महिन्यात सुरू करण्याचे आदेश
युवा मेलघाट न्यूज | अंजनगाव सुर्जी
अंजनगाव सुर्जी – नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा असून ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत, या भूमिकेतून दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. गजाननभाऊ लवटे यांनी अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयाला सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.
या भेटी दरम्यान आमदार गजाननभाऊ लवटे यांनी रुग्णालयातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली, वॉर्डात जाऊन रुग्णांशी संवाद साधला आणि त्यांच्या आरोग्याची, सुरू असलेल्या उपचारांची आणि डॉक्टर, नर्सेस यांच्या सेवेविषयी माहिती जाणून घेतली. रुग्णांनी देखील उपचार चांगले मिळत असल्याचे सांगितले, मात्र काही ठिकाणी सुविधांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर आमदार लवटे यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. नागरिकांना कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा कमी पडता कामा नये, आलेल्या प्रत्येक रुग्णाची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी, औषधोपचार, तपासण्या आणि आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट आणि कडक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. ग्रामीण रुग्णालय हे गोरगरीब जनतेचा आधार आहे, त्यामुळे सेवेत कसूर होता कामा नये, असेही ते म्हणाले.
याच दौऱ्यात आमदार गजाननभाऊ लवटे यांनी अंजनगाव सुर्जी येथील प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीची देखील पाहणी केली. या इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी थेट संपर्क साधून चर्चा केली. सध्या जुन्या इमारतीमध्ये रुग्णांची मोठी गर्दी होत असून उपलब्ध सुविधांवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे नवीन इमारतीचे काम तातडीने पूर्ण करून येत्या दोन ते तीन महिन्यांत नवीन इमारतीचे उद्घाटन करून रुग्णालयाचे कामकाज लवकरात लवकर नवीन सुसज्ज इमारतीत स्थलांतरित करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नवीन इमारत सुरू झाल्यास रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा, पुरेशी जागा, स्वच्छता आणि सुसज्ज वातावरण उपलब्ध होईल, त्यामुळे आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.




या प्रसंगी प्रदेश प्रवक्ते मा. प्रेमभाऊ बोके, युवासेना जिल्हाप्रमुख मा. अंकुश पाटील कावडकर, शिवसेना जिल्हा समन्वयक मा. गुणवंत पाटील गावंडे, विधानसभा संघटक मा. बबनराव विल्हेकर, नगरपरिषद अंजनगाव सुर्जी चे सभापती मा. नईम भाई बेग, नगरसेवक मा. सोनुभाऊ जुनघरे, मा. गजानन विजेकर, मा. अविनाशभाऊ ढेंगे, सामाजिक कार्यकर्ते मा. अशोकभाऊ मोरे, युवा कार्यकर्ते मा. यश दादा लवटे, युवासेना विधानसभा समन्वयक मा. पंकजभाऊ राणे, युवासेना दर्यापूर तालुकाप्रमुख मा. सागरभाऊ गिरे, उपशहर प्रमुख मा. दीपकभाऊ बगाडे, मा. निलेशभाऊ पारडे, मा. मंगेशभाऊ पारडे, मा. दर्शनभाऊ गवई तसेच इतर पदाधिकारी, नागरिक व ग्रामीण रुग्णालयातील नर्स व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











