आमरण उपोषणाच्या इशाऱ्याची जिल्हा बँकेने घेतली दखल; नवीन पीककर्ज वाटपाला मान्यता: १०० टक्के पीककर्जाच्या मागणीवर शेतकरी आंदोलनावर ठाम; खरीपला ५० टक्के तर रब्बीच्या नवीन कर्जाला १०० टक्के वाटप, आमरण उपोषण तूर्तास स्थगित
युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क____________________________ दर्यापुर : पात्र शेतकऱ्यांना मंजूर असलेले १०० टक्के पीककर्ज वितरित करावे, बंद असलेले कर्जवाटप पुन्हा सुरू करावे आणि नवीन पात्र शेतकऱ्यांनाही पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्याची अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दखल घेतली आहे. बँकेने रब्बी हंगामातील नवीन पात्र शेतकऱ्यांना १०० टक्के पीककर्ज वाटप करण्यास मान्यता दिल्याने माजी अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांच्या कुरळ पूर्णा (ता. चांदूरबाजार) येथील निवासस्थानी नियोजित करण्यात आलेले आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
मात्र, कर्जमाफी मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे १०० टक्के पीककर्ज वाटपाचे निर्देश असतानाही खरीप हंगामात केवळ ५० टक्के कर्जवाटप करण्यात आले, यावर आंदोलनकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. रब्बीच्या नवीन कर्जाला १०० टक्के वाटप आणि खरीपच्या पात्र शेतकऱ्यांना केवळ ५० टक्के वाटप, अशी दुटप्पी भूमिका बँकेने घेणे योग्य नसून खरीप पीककर्जाची उर्वरित ५० टक्के रक्कम तातडीने वितरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त अमित पाटील होले व इंजी. अनिकेत वाकपांजर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गांधीगिरी आंदोलन करत अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला निवेदन दिले होते. पात्र शेतकऱ्यांना मंजूर पीककर्जापैकी केवळ ५० टक्के रक्कम मिळाल्याचा, तर उर्वरित कर्जवाटप बंद असल्याचा मुद्दा निवेदनातून मांडण्यात आला होता. तसेच नवीन पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती.
मागण्यांवर आठ दिवसांत ठोस तोडगा निघाला नाही, तर बच्चू भाऊ कडू यांच्या कुरळ पूर्णा येथील निवासस्थानी शांततापूर्ण आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर बँकेने रब्बी हंगामातील नवीन पात्र शेतकऱ्यांना १०० टक्के पीककर्ज वाटपाला मान्यता दिल्याने नियोजित आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
१०० टक्के पीककर्जासाठी आंदोलन कायम
रब्बीच्या नवीन पात्र शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जवाटपाचा निर्णय सकारात्मक आहे. मात्र, खरीप हंगामातील कर्जमाफी मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतरही केवळ ५० टक्के कर्जवाटप करणे अन्यायकारक आहे. पात्र शेतकऱ्यांना मंजूर असलेले संपूर्ण १०० टक्के पीककर्ज मिळालेच पाहिजे, अशी भूमिका अमित पाटील होले व इंजी. अनिकेत वाकपांजर यांनी व्यक्त केली.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्याने आता १०० टक्के पीककर्ज वाटपाच्या मागणीसंदर्भात बँकेचे प्रशासक यांना निवेदन देण्यात येणार आहे. प्रशासकांकडून सकारात्मक निर्णय न मिळाल्यास पुढील आंदोलनाची भूमिका निश्चित करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर बँकेने रब्बीच्या नवीन पीककर्जाबाबत घेतलेली दखल ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची प्राथमिक दखल मानली जात असली, तरी खरीप हंगामातील पात्र शेतकऱ्यांना उर्वरित ५० टक्के पीककर्ज कधी मिळणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे बँक प्रशासक याबाबत काय निर्णय घेतात, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनात अमित पाटील होले, इंजी. अनिकेत वाकपांजर, प्रमोद पाटील होले, मा. उपसरपंच अनिल पाटील होले, विजय पाटील टापरे, मा. उपसरपंच गौतम वाकपांजर, सुभाष खंडारे, नीलेश राऊत, अनिल घुरडे, अंबादास वाकपांजर, अशोक जुंबळे, मा. उपसरपंच बाळासाहेब वाकपांजर, सतीश चुडे, नागेश होले, देविदास ओलोकार, सुधाकर वाकपांजर, नंदकिशोर टापरे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.










