एसडीपीओ गरुड यांची चिखलदऱ्यामध्ये धडक कारवाई; मुख्य बाजारपेठेत वरली मटका अड्डा उद्ध्वस्त, दोघांना अटक
युवा मेळघाट न्यूज – वृत संकलन
चिखलदरा / विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा या पर्यटन स्थळी सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी माधव गरुड यांनी स्वतः धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. शहराच्या मुख्य बाजारपट्टीत सुरु असलेल्या वरली मटक्याच्या अड्ड्यावर टाकलेल्या या धाडीत दोन आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली असून एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कशी झाली कारवाई? धारणी उपविभागाचे एसडीपीओ माधव गरुड यांना चिखलदरा मुख्य बाजारात खुलेआम वरली मटका सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी चिखलदरा ठाणेदार आणि त्यांच्या पथकाला सोबत घेत २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी बाजारपेठेत सापळा रचला.
यावेळी वरली मटक्याचे आकडे घेत असताना प्रवीण नवले आणि राजेश बेलसरे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून वरली मटक्याच्या चिठ्ठ्या, आकडे लिहिलेले कागदी तुकडे, दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणातील तिसरा मुख्य आरोपी एस. एम. चौबे हा घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या धडक कारवाईमुळे चिखलदऱ्यातील अवैध मटका व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमध्ये हेडकॉन्स्टेबल मंगेश पाटील आणि त्यांच्या चमूने मोलाची भूमिका बजावली.









