दर्यापूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी
युवा मेलघाट न्यूज ________________________________ दर्यापूर : दर्यापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे दर्यापूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष पार्थ प्रफुल्लराव लोडम व जिल्हा उपाध्यक्ष राज सं. गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली दर्यापूर तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
पावसाअभावी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई व पीकविम्याची मदत देण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदत व विशेष दुष्काळी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी पार्थ रुमाले, करण चक्रे, ओम येवले, सोहम घुरडे, अधिराज पाचडे, मेहेर ठाकरे, सुजित दांडगे, सोपान शिरसागर आणि रोहित घरडे यांच्यासह महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेने केली आहे.










