धारणी: मनरेगाच्या बिलापोटी 10 हजारांची लाच मागितली, लाचलुचपतच्या सापळ्यात पंचायत समितीचा कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक जाळ्यात
युवा मेलघाट न्यूज नेटवर्क –
धारणी, जि. अमरावती ग्रामीण, दि. 31 जुलै 2025 | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 2 लाख रुपये मंजूर झालेल्या रूपया पैकी बाकी राहिलेल्या विहीर बांधकामाच्या 1 लाख 30 हजार रुपयांचे बिल काढून देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या धारणी पंचायत समितीतील कनिष्ठ तांत्रिक सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ग्रामीणच्या पथकाने गुरुवारी पंचायत समिती कार्यालयात 5 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी सन 2024 मध्ये मनरेगा योजनेअंतर्गत आपल्या शेतात विहीर बांधकामाचे काम पूर्ण केले होते. त्यांचे 1 लाख 30 हजार रुपयांचे बिल मंजूर होऊन पंचायत समिती धारणी येथे आले होते. हे बिल काढून देण्यासाठी पंचायत समितीमध्ये कार्यरत असले कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक बापू काशीनाथ बनसोडे वय 48 वर्षे रा. मु. पो. गंगापूर ता.जिल्हा लातूर यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली. नंतर हा व्यवहार 5 हजार रुपयांमध्ये ठरला. याबाबत तक्रारदार यांनी 29 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करून 31 जुलै रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी बापू बनसोड हे तक्रारदाराकडून 5 हजार रुपये स्वीकारत असताना पकडले गेले.
या प्रकरणी पो.स्टे. धारणी येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुजाता बन्सोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पथकात पोलीस निरीक्षक निशा मेसरे, पो.हवा. प्रमोद रायपुरे, पो.हवा. सुधीर चर्जन, पो.शि. वैभव जायले व चालक पो.ना. सतीश किटूकले यांचा समावेश होता. या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिंद्र शिंदे यांनी केले. पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक श्री. राजेश राठोड यांनी काम पाहिले.
नागरिकांनी भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असल्यास लाचलुचपत विभागाशी 0721-2553055 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.








