कर्जमुक्तीसाठी ‘पॉवर ऑफ अटर्नी’ ला 4800 रुपयांची लाच; धारणीचे प्रभारी सहदुय्यम निबंधकासह तिघे ACB च्या जाळ्यात
युवा मेलघाट न्यूज ________________________________ धारणी, दि. ३ सप्टेंबर : आदिवासी बहुल क्षेत्र मेलघाटात नागरिकांच्या अज्ञानतेचा फायदा घेण्यासाठी भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी जणु वाट बघत असते. पण आता मेळघाटातील नागरिक जागृत होत आहे. व अश्या अधिकारी कर्मचारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून चांगलाच धडा शिकवला जात आहे. ACB चे अधिकारी व कर्मचारी पथक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत कार्यवाही करत आहे. मेळघाटात एका पाठोपाठ ACB ची बेधडक कारवाई होत आहे, परंतु हे भ्रष्टाचार प्रवृत्तीचे कर्मचारी अधिकारी धडा न घेता आपल्या लालसापोटी ACB च्या जाळ्यात एका मागे एक अडकले जात आहे.
अशाच एक घटनेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी झालेल्या एका शेतकऱ्याकडून पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर करण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागणाऱ्या धारणी सहदुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहदुय्यम निबंधकालाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. एसीबीने बुधवार, दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांनी धारणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा रचून ही धडक कारवाई केली.
या कारवाईत १) लोकसेवक संतोष विष्णुपंत दुधंडे (वय ४७, पद- कनिष्ठ लिपिक तथा प्रभारी सहदुय्यम निबंधक, धारणी, रा. हरिहर नगर धारणी), २) लकी सुनील राठोड (वय ३२, IT ऑपरेटर कंत्राटी, रा. कुसुमकोट बडा) आणि ३) खाजगी इसम साबुलाल सानू भिलावेकर (वय २९, साई ऑनलाईन सेंटर, रा. कुसुमकोट बडा) अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण: एका ४५ वर्षीय तक्रारदार शेतकऱ्याची ६ एकर शेती असून त्यांचे कर्ज कर्जमाफी योजनेत माफ झाले होते. त्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी करण्यासाठी ते दि. १९ ऑगस्ट रोजी धारणी कार्यालयात गेले असता कनिष्ठ लिपिक दुधंडे यांनी ७ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत त्यांनी दि. १ सप्टेंबर रोजी ला.प्र.वि. अमरावतीकडे तक्रार केली. त्यानंतर दि. १ सप्टेंबर रोजीच १२.१२ ते १३.४५ दरम्यान झालेल्या पडताळणीत आरोपी दुधंडे यांनी खाजगी इसम भिलावेकर यांच्यामार्फत ४८०० रुपये लाच मागितल्याचे आणि ती भिलावेकरकडे देण्याची संमती दिल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार सापळा लावण्यात आला असता, दुधंडे यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून लकी राठोड याने दुधंडे यांच्या समक्षच ४८०० रुपये स्वीकारले. राठोड याच्या पॅन्टच्या मागील खिशातून ही रक्कम जप्त करण्यात आली. तर साबुलाल भिलावेकर याला कार्यालयाबाहेरून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस स्टेशन धारणी येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींच्या घरझडतीची कारवाई सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक मंजुषा भोसले यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, संजय शिंदे, अंमलदार सुधीर चर्जन, वैभव जायले व चालक सतीश किटूकले यांच्या पथकाने केली.









