बालिका युवानीला अखेर न्याय – ८ दिवसांचे आमरण उपोषण मागे, वैद्यकीय अधीक्षकांची बदली
युवा मेलघाट न्यूज़ / प्रतिनिधि धारणी
धारणी : उपजिल्हा रुग्णालयातील कथित डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ४ वर्षीय आदिवासी चिमुकली युवानीच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी सुरू असलेले ८ दिवसांचे आमरण उपोषण अखेर सोमवारी रात्री मागे घेण्यात आले.
युवानीच्या मृत्यूला उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत दोषींवर फौजदारी कारवाई करावी आणि प्रशासनाने जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी नितेश भिलावेकर, नीरज चिरोटे यांच्यासह ग्रामस्थ आणि युवानीचे आई-वडील व कुटुंबातील ४ सदस्य गेल्या ८ दिवसांपासून उपोषणाला बसले होते.




या आंदोलनाची दखल शासनाने घेतली असून आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या विशेष पुढाकाराने आणि युवा स्वाभिमानचे धारणी तालुका अध्यक्ष दुर्योधन जावरकर, आमदार केवलराम काळे यांच्या विशेष प्रयत्नाने उपोषणकर्त्यांचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याशी मोबाईलवरून बोलणे करून देण्यात आले.
आरोग्यमंत्र्यांनी १० दिवसांच्या आत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. जावरकर यांची अमरावती जिल्ह्याबाहेर बदली करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जावरकर यांची चिखलदरा येथे बदली करण्याचा शासन आदेश प्राप्त झाला.
हा आदेश तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी उपोषणकर्ते नितेश भिलावेकर व नीरज चिरोटे यांना सुपूर्द करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, १० दिवसांत आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर १५ सप्टेंबरपासून पुन्हा मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. युवानीच्या कुटुंबीयांनी आणि आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने मागणीची दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले असले तरी आता सर्वांचे लक्ष १० दिवसांत होणाऱ्या कारवाईकडे लागले आहे.









