डोमा आश्रमशाळेत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रबोधन, आमदार व अधिकाऱ्यांचा शाळेतच मुक्काम
डोमा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे प्रबोधन; आमदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मुक्काम
युवा मेलघाट न्यूज़
मेळघाट – चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील शासकीय उच्च व माध्यमिक विद्यालय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना सकारात्मक, सुरक्षित आणि विश्वासाचे वातावरण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आश्रमशाळेतील काही विद्यार्थ्यांना कथितरीत्या भूतबाधा झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे प्रबोधन व समुपदेशन करण्यात आले. सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजेरी वादक संदीपपाल महाराज गीते रंभापूरकर व त्यांच्या संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.




या सृष्टीमध्ये भूत, भानामती, चमत्कार, अंगात देव येणे या अफवा असून याने अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. या अंधश्रद्धेच्या खाईत अनेक परिवाराचे जीवन नष्ट झाले आहे. आपले व आपल्या परिवाराचे समृद्ध जीवन पाहायचे असेल तर विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून अंधश्रद्धेला थारा देऊ नका, असे आवाहन आपल्या प्रबोधनवाणीतून संदीपपाल महाराज यांनी केले. माझ्या सावित्रीच्या लेकीने अंगात आणायचे असेल तर जिजाऊ, अहिल्या यांना आणा. संत गाडगेबाबा सह आदी संत महापुरुषांनी विज्ञानवादी दृष्टिकोन मांडून अंधश्रद्धेवर प्रहार केला, असे त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजून सांगितले.
विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी एक-एक करून संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांच्या भविष्यासंदर्भात मार्गदर्शन केले. शिक्षणावर लक्ष केंद्रित करून नियमितपणे शाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहावे, यासाठी पालक व विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.




यावेळी आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशीष येरेेकर, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी गांधी, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, उपविभागीय अधिकारी तळवी, तहसीलदार मोराणकर, गटविकास अधिकारी खेडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बायस, नायब तहसीलदार धावडे, गटशिक्षणाधिकारी गिरासे, ठाणेदार पाटील यांच्यासह सरपंच सुनील उईके, मुख्याध्यापक चौधरी, शैलेश म्हाला, कृष्णा वछले, श्रीराम आठवले, भूषण देव्हस, स्वप्नील भक्ते, आकाश खैरकर, सोबत पत्रकार व कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत सामूहिक भोजन केले. तसेच शाळेतील वसतिगृहाचे उद्घाटन विद्यार्थिनी गायत्री उईके यांच्या हस्ते करण्यात आले.


विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकारी डोमा आश्रमशाळेत मुक्कामी राहिले. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विद्यार्थ्यांसोबतच राहिल्याने त्यांच्या मनातील भीती कमी होऊन प्रशासन आपल्या सोबत आहे असा विश्वास निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांना सुरक्षित, सकारात्मक आणि विश्वासाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये आणि सर्व विद्यार्थी पुन्हा नियमितपणे शाळेत उपस्थित राहावेत, यासाठी प्रशासन व शाळा व्यवस्थापनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
या कार्यक्रमात हार्मोनियम वादक गणेश पिसे, गायक नंदू चांबट, हरी सपकाळ, नाजूक पिसाट यांनी साथ दिली.










