शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा जामली जिल्हा परिषद सर्कलमध्ये जनसंपर्क दौरा; कार्यकर्ता संवाद, पदवाटप आणि आरोग्य जनजागृती
युवा मेलघाट न्यूज़| चिखलदरा प्रतिनिधि
चिखलदरा. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने चिखलदरा तालुक्यातील जामली आर जिल्हा परिषद सर्कलमध्ये जनसंपर्क दौरा, कार्यकर्ता संवाद बैठक, पदवाटप कार्यक्रम आणि आरोग्य विषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दौऱ्यामध्ये जामली आर, अंबापाटी, गिरगोटी आणि खोंगडा या गावांना भेटी देण्यात आल्या. या दौऱ्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य सदस्या सोनालीताई देशमुख, उपजिल्हा प्रमुख भुषण भाऊ नागे, जिल्हा प्रमुख पियुष माहुले, शहर प्रमुख तथा कामगार सेना जिल्हा प्रमुख सुभाष घुटे, तालुका उपाध्यक्ष रामकिसन सेलूकर, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख प्रविण बेलसरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सर्कल प्रमुख दीपक भुसूम, उपतालुका प्रमुख सहदेव बेलसरे, रामचंद्र उमरकर, नंदलाल बेलसरे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
उपजिल्हा प्रमुख भुषण भाऊ नागे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी प्रथम प्राथमिक आरोग्य उपकेंद्र जामली आर, अंगणवाडी केंद्र जामली आर, अंबापाटी उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र अंबापाटी तसेच गिरगोटी आणि खोंगडा येथे प्रत्यक्ष भेटी दिल्या. यावेळी स्थानिक नागरिकांच्या आरोग्यविषयक अडचणी समजून घेत त्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. गरोदर माता, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या आरोग्याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आणि पदवाटप करण्यात आले. तसेच जामली आर सर्कलमध्ये लवकरच मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या शिबिराद्वारे गावातील नागरिकांना मोफत तपासणी आणि औषधोपचार मिळणार आहे.




दौऱ्यादरम्यान गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या काही रुग्णांच्या घरी देखील पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यांच्या उपचारासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोग्य सेवा प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि समाजहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे हे शिवसेनेचे ध्येय आहे. यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.








