आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट
युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क _____________________ मुंबई – राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थान येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तीन महत्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि आरोग्य संस्थांचे स्टार रेटिंग असे या तीन उपक्रमांचे स्वरूप आहे.
या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोग्यविषयक माहितीचे केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी प्रभावी वापर व्हावा, यासाठी या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तंत्रज्ञानाधारित उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी सध्या 40 हून अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत. या सर्व पोर्टलवरील महत्त्वाची माहिती एकत्रित करून एकाच व्यासपीठावर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे. या डॅशबोर्डच्या माध्यमातून माता व बाल आरोग्य, क्षयरोग नियंत्रण, असंसर्गजन्य आजारांची तपासणी यासारख्या विविध कार्यक्रमांशी संबंधित प्रमुख निर्देशांकांचे राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय विश्लेषण करता येणार आहे. त्यामुळे आरोग्यविषयक आव्हाने तातडीने ओळखणे, जिल्ह्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि जिथे गरज आहे तिथे त्वरित उपाययोजना करणे शक्य होणार आहे. आरोग्यविषयक माहितीचे रूपांतर आता कृतीयोग्य डेटामध्ये होणार असून, प्रशासकीय निर्णय अधिक अचूक आणि गतिमान होतील.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या ‘महा पल्स एआय’ या महत्त्वाकांक्षी आणि दूरदर्शी उपक्रमाची विस्तृत माहिती…
नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून 104 कॉल सेंटरचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. नागरिकांकडून येणाऱ्या कॉल्ससोबतच आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या संपर्क कॉल्सचेही नियोजन या केंद्रामार्फत केले जाणार आहे. अतिजोखमीच्या गर्भवती माता, प्रसूतीनंतरच्या माता, क्षयरुग्ण तसेच असंसर्गजन्य आजार असलेल्या नागरिकांचा नियमित पाठपुरावा या केंद्रातून केला जाईल. यासोबतच रुग्णालयातील सेवांबाबत नागरिकांचे अभिप्रायही जाणून घेतले जाणार आहेत. या केंद्रात रोज सुमारे एक हजार कॉल्स हाताळण्याची क्षमता असून, त्यासाठी प्रशिक्षित ऑपरेटर्स नेमण्यात आले आहेत. कोणतेही गंभीर किंवा तातडीचे प्रकरण आढळल्यास त्याची माहिती तात्काळ संबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना कळवण्याची यंत्रणाही विकसित करण्यात आली आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या सेवांचे प्रमाणीकरण आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. विशेष सेवांची उपलब्धता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषधांचा पुरवठा, प्रयोगशाळा सेवा, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा, प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, रुग्णालयातील स्वच्छता, सुविधांची उपयुक्तता आणि रुग्णांचे अभिप्राय अशा विविध निकषांवर आरोग्य संस्थांचे मूल्यमापन केले जाणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना आता कोणत्या रुग्णालयात कोणत्या सेवा उपलब्ध आहेत, याची सर्वसमावेशक माहिती घरबसल्या मिळू शकेल. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीवर जिल्हास्तरावर तातडीने कारवाई करून संबंधित नागरिकाला सेवा मिळाली की नाही, याची खात्री करण्याची व्यवस्थाही यात करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ सेवा दिली का, यावरच नव्हे तर सेवा मिळाली का, यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
दरम्यान, महा पल्स एआय या उपक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्याची पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक स्मार्ट होणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. जिल्ह्यातील 104 शासकीय आरोग्य संस्था आणि 12 तालुक्यांना एका एकात्मिक डिजिटल प्रणालीशी जोडले जाणार आहे. या उपक्रमामुळे आरोग्य सेवांचे निरीक्षण, उपलब्ध संसाधनांचे व्यवस्थापन आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा पाठपुरावा अधिक प्रभावी होणार आहे.










