दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय झाला निर्णय; पंचनामे व पहिली अधिसूचना कधी?
युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क –
राज्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पीक नुकसानीचे पंचनामे बुधवारपासून करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. तसेच शनिवारपूर्वी दुष्काळासंदर्भातील पहिली अधिसूचना जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.
आतापर्यंत जी माहिती आली आहे, त्या आधारावर दुष्काळ कुठे आहे व त्याच्या काय उपाययोजना आहेत यासंदर्भात ही अधिसूचना असेल. त्यानंतरही याबाबत माहिती येत राहणार आहे. त्यामुळे एखादा भाग सुटला तर त्याचा समावेश पुढे करता येईल अशी तजवीज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आतापर्यंत क्षेत्रीय पातळीवरील माहिती पडताळली असता बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती आहे. पिके करपलेली आहेत. विशेषतः सोयाबीन, मका, कापूस, ज्वारी, भात सारख्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री, मंत्री करणार दुष्काळग्रस्त भागाचा दौरा
मुख्यमंत्री फडणवीस बुधवारपासून दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत, तसेच मंत्री आणि आमदारांनाही बांधावर जाऊन पिकांची पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
समितीत या मंत्र्यांचा समावेश
◼️ राज्यातील दुष्काळासंदर्भातील प्राथमिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी गतीने निर्णय घेता यावे, यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला मंत्रिमंडळाचेच अधिकार असतील.
◼️ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, प्रताप सरनाईक, मकरंद जाधव-पाटील, बाबासाहेब पाटील आदी मंत्र्यांचा समावेश आहे. मुख्य सचिव राजेश अगरवाल या समितीचे सदस्य सचिव असतील.
◼️ राज्यभरातून येणाऱ्या माहितीच्या आधारे कोणत्या भागात दुष्काळ आहे, तिथे काय मदत व उपायोजना करायची याबाबत ही समिती निर्णय घेईल.
आढावा बैठकींना आचारसंहितेचा खोडा
राज्यातील सर्व महसुली विभागात दुष्काळाबाबत आढावा बैठका घेण्याची जबाबदारी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर देण्यात आली आहे. मंगळवारी राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्याने बुधवारी पुण्यात होणारी आढावा बैठक अधांतरी आहे. कृषी विभागाला केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवून बैठकीची परवानगी घ्यावी लागणार आहे.
पुढील सात-आठ महिने आपल्याला काढायचे असून त्यादृष्टीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ज्या-ज्या वेळी दुष्काळ आणि अतिवृष्टीमध्ये मदत द्यावी लागली, त्यावेळी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना मदत दिली आहे. यावेळीही अशी मदत दिली जाईल.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलकापूर, ता. कळंब, जि. धाराशिव येथे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि झालेल्या नुकसानाची माहिती घेतली.
यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔔 सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी युवा मेलघाट न्यूज़ चैनल ला फॉलो करा https://whatsapp.com/channel/0029Vb7sAujK0IBi6xYEtI3C














