अहिल्यादेवी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; ३ लाख ५५ हजार शेतकरी पात्र: पहिल्या यादीतील १२ लाख शेतकऱ्यांना लाभ वितरित
युवा मेलघाट न्यूज नेटवर्क __________________________ मुंबई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठीची दुसरी यादी ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीत एकूण ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
ही यादी जिल्हानिहाय आणि बँकनिहाय प्रसिद्ध करण्यात आली असून, ती संबंधित बँक शाखा, विकास संस्था तसेच ग्रामपंचायतींमध्येही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पहिल्या यादीतील १२ लाख शेतकऱ्यांना लाभ वितरित
पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर १० हजार ११४ कोटी ९० लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. यामध्ये ७ ऑगस्ट २०२६ रोजी ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २८ कोटी ६० लाख रुपये, तर २४ ऑगस्ट २०२६ रोजी ६ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना ५ हजार ८६ कोटी ३० लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.
दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांनी काय करावे?
दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम तपासून नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’ मध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे.
राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.
विभागनिहाय पात्र लाभार्थ्यांची संख्या:
- छत्रपती संभाजीनगर विभाग – १ लाख ९५ हजार ८९९
- अमरावती विभाग – ७१ हजार ७९६
- नागपूर विभाग – ३४ हजार ५२०
- नाशिक विभाग – २५ हजार ४७१
- पुणे विभाग – २३ हजार ११७
- कोकण विभाग – ४ हजार ८११
_______ Advertisement____________________
_______ Advertisement____________________









