टेमलीत मध्यरात्री दुकानाला आग; ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून जागीच मृत्यू
युवा मेलघाट न्यूज | प्रतिनिधी धारणी
धारणी /टेबंली : मेळघाटातील धारणी तालुक्यातील धारणी शहर पासून जवळच असलेल्या टेबंली गावात काल रात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. आदिवासी आश्रम शाळेच्या गेटसमोर असलेल्या एका छोट्या किराणा दुकानात लागलेल्या आगीत ७० वर्षीय शालिकराम राजाराम भिलावेकर यांचा दुकानातच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, शालिकराम भिलावेकर हे गावातील शेतकरी असून आश्रम शाळेच्या समोर त्यांचे छोटेसे दुकान होते. रात्री ते नेहमीप्रमाणे दुकानातच झोपत असत. काल रात्री मुसळधार पाऊस सुरू होता. लाईट नसल्यामुळे त्यांनी रात्री १० ते ११ च्या सुमारास दुकान आतून बंद करून चिमणी किंवा मेणबत्ती लावून झोपले होते.
प्राथमिक अंदाजानुसार, मेणबत्ती किंवा चिमणी पडल्याने दुकानातील साहित्याने पेट घेतला. शॉर्ट सर्किटचे कारण नसल्याचे सांगण्यात येत आहे. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. आतून बंद असल्यामुळे त्यांना दरवाजा उघडता आला नाही आणि ते आतच अडकले.
पावसाच्या जोरदार आवाजामुळे त्यांच्या आरडाओरडाचा आवाज शेजारील लोकांपर्यंत पोहोचला नाही. बराच वेळानंतर शेजाऱ्यांना आग दिसली. त्यांनी धाव घेईपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. या आगीत दुकानातील फ्रीज, पंखा, भांडी, किराणा सामान आणि रोख पैसे असे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे टेबंली गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
_______ Advertisement___________
_______ Advertisement___________









