१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा
श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा
युवा मेलघाट न्यूज _______________________________ तालुका प्रतिनिधी दर्यापूर:- थिलोरी ता. दर्यापूर येथील श्री मारोती संस्थान, थिलोरी येथे १८०५ पासून अखंडपणे जपली जात असलेली गणेशोत्सवाची ऐतिहासिक व भक्तिमय परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. तब्बल दोन शतकांहून अधिक काळाची परंपरा लाभलेल्या या गणेशोत्सवाला परिसरातील भाविकांच्या श्रद्धेत विशेष स्थान असून, ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी या गणरायाची भक्तांमध्ये श्रद्धा आहे.
श्री मारोती संस्थानच्या पावन परिसरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. काळ बदलला, उत्सवाचे स्वरूप बदलले, तरी पूर्वजांनी जपलेल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीकडे सुपूर्द करण्याची परंपरा थिलोरीत आजही कायम आहे.
पहिल्या रात्री गणरायाचा जन्मोत्सव
गणेशोत्सवाच्या पहिल्या रात्री पारंपरिक पद्धतीने श्री गणरायाचा जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. पूजा-अर्चा, धार्मिक विधी आणि गणरायाच्या जयघोषात जन्मोत्सवाचा सोहळा पार पडतो. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय होते.
दुसऱ्या दिवशी पारंपरिक मिरवणूक व ‘हरीचा चेंडू’
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गणरायाची पारंपरिक मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि ‘हरीचा चेंडू’ ही जुनी परंपरा. भक्ती, श्रद्धा आणि लोकपरंपरेचा सुंदर संगम या मिरवणुकीत अनुभवायला मिळतो.
विशेष म्हणजे गणपती विसर्जनाच्या पारंपरिक सोहळ्यासाठी पुंडा, ता. अकोट येथील ढोलाचे भजणी मंडळ सहभागी होते. या मंडळाची तिसरी पिढी थिलोरीच्या गणेशोत्सवातील ही परंपरा पुढे चालवत आहे. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ही सेवा आजही त्याच श्रद्धेने सुरू असल्याने थिलोरीच्या गणेशोत्सवाला विशेष सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
तिसऱ्या दिवशी भावपूर्ण विसर्जन व महाप्रसाद
गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीने गणरायाची मिरवणूक काढून भावपूर्ण वातावरणात श्री गणेशाचे विसर्जन करण्यात येते. ढोल-भजनीच्या गजरात, गणरायाच्या जयघोषात आणि भक्तांच्या डोळ्यांत दाटलेल्या भावनेत बाप्पाला निरोप दिला जातो.
विसर्जनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. भक्तिभावाने सहभागी होणारे ग्रामस्थ व भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. या माध्यमातून श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेशही दिला जातो.
जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, थिलोरी यांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा हा गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नसून १८०५ पासून चालत आलेल्या श्रद्धा, संस्कृती, लोकपरंपरा आणि पिढ्यान्पिढ्यांच्या भक्तीचा जिवंत वारसा आहे. श्री गणरायाच्या चरणी नवस बोलणारे आणि मनोकामना पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञतेने दर्शनासाठी येणारे भाविक या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य ठरतात.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषात थिलोरीच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाची भक्तिमय सांगता होते.
श्रीराम ज्वेलर्स धारणी चे संचालक श्री दिनेश राऊत सर यांच्या निवासस्थानी बसविलेले श्री गणपति बाप्पा
गजानन रेसिडेन्सी -2 धारणी येथील विराजमान गणपति बाप्पा










