टिटंबा विषबाधा प्रकरण: अफवांमुळे गर्दी करू नका, विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर – सहा. जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांचे आवाहन
युवा मेलघाट न्यूज
धारणी, २६ जुलै २०२६
धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळेत शनिवार आणि रविवारी घडलेल्या विषबाधेच्या घटनांनंतर सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांची मोठी गर्दी शाळा आणि दवाखान्यात जमू लागली आहे. या गर्दीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी अधिकृत पत्रकाद्वारे माहिती देत नागरिकांना आणि पालकांना शांततेचे आवाहन केले आहे.
पत्रकानुसार दिनांक 25 जुलै 2026 रोजी सायंकाळी टिटंबा आश्रमशाळेतील अंदाजे 70 विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या, मळमळ आणि चक्कर येणे यासारखी लक्षणे दिसून आली. तातडीने सर्व विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय धारणी SDH येथे दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दाखल असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून कोणालाही कोणताही धोका नाही. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत वैद्यकीय पथक, पुरेसा औषधसाठा आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
सिद्धार्थ शुक्ला यांनी स्पष्ट केले की गेल्या दोन दिवसांच्या घटनाक्रमामुळे आणि सोशल मीडियावरील अफवांमुळे लोकांची गर्दी शाळा आणि दवाखान्यात वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पैनिकचे वातावरण आहे. प्रशासन आणि तज्ञ डॉक्टर आपले काम कुशलतेने करत आहेत. “लोकांनी आणि पालकांनी गर्दी करू नये. विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आहे. चिंतेची कोणतीही गोष्ट नाही. लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल. प्रशासन आणि आरोग्य विभागाला सहकार्य करावे” असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
युवा मेलघाट न्यूज
धारणी, २७ जुलै २०२६ | धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत २५ जुलै २०२६ रोजी घडलेल्या विषबाधा प्रकरणानंतर उपजिल्हा रुग्णालय धारणीतील वैद्यकीय पथकाच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या संदर्भात उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. शैलेश जिराफे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिनांक २५/७/२०२६ रोजी आश्रम शाळा टीटंबा येथे विद्यार्थ्यांना जेवणामधून किंवा दुसऱ्या कारणामधून जो त्रास झाला, त्या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात उत्तम औषधोपचार व त्यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली. सर्व वैद्यकीय अधिकारी व इतर रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी एकजुटीने सहभाग घेऊन गंभीर परिस्थितीला सहजतेने हाताळून एक उदाहरण निर्माण केले आहे.
खरच सर्व वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, चतुर्थी वर्ग कर्मचारी तसेच RBSK चमू व ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले सर्वांचे आभार. आणि मला अभिमान वाटतो कि अपुरी डॉक्टरांची संख्या व अनेक गोष्टी चा अभाव असताना सुद्धा कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी सेवा देत आहेत.
या गंभीर प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, निष्पाप जीवांची काळजी घेणे हे सर्वाचे कर्तव्य आहे, पण उगाच कुणा निरपराधावर कार्यवाही नको… तसेच दोषींना माफी नको, एवढीच अपेक्षा आहे.
नागरिकांची प्रतिक्रिया: टिटंबा येथील घटनेमुळे परिसरातील पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. लहान मुलांच्या जेवणातून विषबाधा होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी वेळेत उपचार करून मुलांचे जीव वाचवले, त्याबद्दल त्यांचे आभार. मात्र यापुढे आश्रमशाळेतील अन्नाच्या गुणवत्तेवर आणि सेंट्रल किचनच्या कारभारावर प्रशासनाने कठोर नियंत्रण ठेवावे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि निरपराध व्यक्तींना यात गोवू नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे दाखल असलेल्या सर्व ७० विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.








