काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा, तक्रारसाठी हेल्पलाईन जारी
युवा मेलघाट न्यूज नेटवर्क
धारणी | 15 जून 2026 :धारणी तालुक्यात खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया व डीएपीच्या टंचाईबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने पूर्णविराम दिला आहे. “तालुक्यात खताचा कोणताही तुटवडा नाही, शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे स्पष्टीकरण तालुका कृषी अधिकारी उमेश जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
गॅस टंचाईचा परिणाम धारणीवर नाही
कृषी विभागाने स्पष्ट केले की, देशातील काही भागात नैसर्गिक वायूच्या तुटवड्यामुळे खत निर्मितीवर परिणाम झाला असला तरी त्याचा फटका धारणी तालुक्याला बसलेला नाही. “संपूर्ण देशात टंचाई आहे” ही माहिती चुकीची व दिशाभूल करणारी आहे.
रेशनिंग पद्धतीने पुरेसा साठा उपलब्ध
सद्यस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांना रेशनिंग पद्धतीने खतांचा पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. बऱ्याचदा खाजगी विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात व इतर उत्पादने खरेदी करण्यास भाग पाडतात. अशा प्रकारांवर विभागाचे लक्ष असून, काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
तक्रार निवारण संपर्क : श्री आकाश ठाकरे, कृषी अधिकारी (गुण नियंत्रण)- मो. 86684 21597 ; श्री ठोंबरे, पंचायत समिती धारणी – मो. 89999 74893 जादा दर, पावती न देणे, लिंकिंग करून इतर माल देणे असे प्रकार आढळल्यास तात्काळ संपर्क साधा.
शेतकऱ्यांसाठी विभागाच्या 7 महत्त्वाच्या सूचना
1. रितसर पावती घ्या : खरेदी केलेल्या खताची विक्रेत्याकडून पावती घ्यावी व दर, मात्रा तपासावी.
2. संतुलित खत व्यवस्थापन : केवळ युरियाच्या मागे न लागता डीएपी व सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही वापर करावा.
3. रासायनिकसोबत जैविक : रासायनिक खतासोबत जैविक व हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
4. पारदर्शी विक्री : दुकानात लावलेले दरपत्रक तपासूनच खरेदी करावी.
5. खराबीची तक्रार : खताचा दर्जा निकृष्ट वाटल्यास विभागाकडे नमुना तपासणीसाठी द्यावा.
6. कृषी सेवा केंद्राचा लाभ : मोफत मार्गदर्शनासाठी पंचायत समितीच्या कृषी सेवा केंद्राला भेट द्यावी.
7. प्रशासनावर विश्वास ठेवा : टंचाईच्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
कृषि विभागाच्या, तालुका कृषी अधीकारी उमेश जाधव यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी घाबरून जाऊन खताची साठेबाजी करू नये. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
खरीप हंगामात मोठी कारवाई: अमरावतीत ₹7.12 लाखांचे बनावट HTBT कापूस बियाणे जप्त, एकास अटक
युवा मेलघाट न्यूज | अमरावती, 15 जून 2026
खरीप हंगामात शेतकऱ्यांना बनावट बियाण्यांपासून वाचवण्यासाठी अमरावती जिल्हा कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे सीमेवर एका शेतावर छापा टाकून ₹7 लाख 12 हजार 800 रुपयांचे बनावट HTBT कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहे.
नेमके प्रकरण काय? : जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांना गुप्त माहिती मिळाली होती की मौजा निमगव्हाण येथे अवैधरित्या HTBT कापूस बियाण्यांचा साठा करण्यात आला आहे. पोलिस व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकला असता 9 गोण्यांमध्ये ‘महाराजा’, ‘विराट’, ‘ग्लायको गार्ड’ व ‘कोहिनूर’ या ब्रँडची 432 पाकिटे आढळून आली.
लक्षात ठेवा: भारतात HTBT कापूस बियाण्यांची विक्री पूर्णपणे प्रतिबंधित आहे. याची लागवड केल्यास पीक खराब होतेच, शिवाय जमीनही नापीक होण्याचा धोका असतो.
आरोपीस अटक : पोलिसांनी गुजरातमधील कच्छ येथील 21 वर्षीय शुभमसिंह चौधरी याला ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध बीज अधिनियम 1966, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










