बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशक विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा – महाराष्ट्र शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
युवा मेलघाट न्यूज़ | प्रतिनिधि अमरावती
अमरावती. महाराष्ट्र शेतकरी संघटना, अमरावती ग्रामीणच्या वतीने जिल्ह्यात बनावट व निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्हाध्यक्ष पार्थ प्रफुल्लराव लोडम यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दि.17 जुलै 2026 रोजी मा.जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन सादर केले।
निवेदनात काय म्हटले?
निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची बनावट बियाणे, खते व कीटकनाशकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे। त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून उत्पादनात घट झाली आहे। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे। महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या 5 प्रमुख मागण्या:
- विशेष तपासणी मोहीम – जिल्ह्यात संशयित दुकानांची तपासणी करून नमुने प्रयोगशाळेत तपासावेत।
- कठोर कारवाई – दोषी विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत।
- बनावट माल जप्ती – बाजारात आढळणारा बनावट माल तात्काळ जप्त करावा।
- तक्रार निवारण कक्ष – शेतकऱ्यांसाठी विशेष तक्रार निवारण कक्ष किंवा हेल्पलाईन सुरू करावी।
- संयुक्त धाडी – कृषी विभाग, पोलीस विभाग व अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकांकडून नियमित धाडी टाकण्यात याव्यात।
पार्थ लोडम म्हणाले की, “शेतकरी हा अन्नदाता आहे। त्याच्या हिताशी खेळ करणाऱ्यांना पाठीशी घालता कामा नये। प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा”। यावेळी ओम तायडे, अनिश वैद्य, आदर्श ठाकरे, प्रसन्न पाटील, शिवम धोत्रे, कृष्णा नंदने, पियुष गायकवाड, शुभम शेडके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते।







