भाजपा जिल्हाध्यक्ष व मेलघाटचे माजी आमदार प्रभुदासजी भिलावेकर मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजना समितीचे सह-अध्यक्ष: मोठी जबाबदारी, शेतपाणंद रस्त्यांच्या कामाला मिळणार गती
युवा मेलघाट न्यूज़ | प्रतिनिधि धारणी
धारणी/अमरावती। मेलघाट विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना” च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठित करण्यात आलेल्या विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीवर मेलघाट विधानसभा क्षेत्राचे सह-अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व मेलघाटचे माजी आमदार मा. प्रभुदासजी भिलावेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पार्टी मेलघाट जिल्हा अमरावती ग्रामीणचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजना म्हणजे काय?
महाराष्ट्र शासनाची ही योजना थेट शेतकऱ्यांशी निगडीत आहे. या योजनेचा उद्देश प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पक्का रस्ता पोहोचवणे हा आहे. यालाच “शेतपाणंद रस्ता” असे म्हणतात. मेलघाटसारख्या आदिवासी व दुर्गम भागात पावसाळ्यात शेतात जाणे, खत-बियाणे नेणे आणि शेतमाल बाजारापर्यंत पोहोचवणे यासाठी रस्त्यांची सर्वात मोठी अडचण असते. या योजनेतून गावागावातील शेतांना जोडणारे रस्ते तयार केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेची कामे पारदर्शक व जलदगतीने व्हावीत यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याच समितीचे सह-अध्यक्षपद आता प्रभुदासजी भिलावेकर यांच्याकडे आले आहे.
प्रभुदासजी भिलावेकर यांचा अनुभव मेलघाटच्या पथ्यावर
मा. प्रभुदासजी भिलावेकर हे सध्या भाजपा मेलघाट जिल्हा अमरावती ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि यापूर्वी मेलघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मेलघाटची भौगोलिक परिस्थिती आणि आदिवासी शेतकऱ्यांच्या समस्या त्यांना चांगल्यापैकी माहित आहेत.स्थानिक नेत्यांच्या मते, त्यांच्या सह-अध्यक्षपदामुळे मेलघाटातील शेतपाणंद रस्त्यांचे प्रस्ताव लवकर मंजूर होतील आणि कामाला गती मिळेल. याचा थेट फायदा धारणी व चिखलदरा तालुक्यातील शेकडो गावांतील शेतकऱ्यांना होणार आहे.
माजी आमदार “प्रभुदासजी भिलावेकर यांच्या नेतृत्वात मेलघाटच्या प्रत्येक शेतापर्यंत रस्ता पोहोचवण्याचे स्वप्न आता साकार होईल. ही नियुक्ती मेलघाटच्या शेतकरी व आदिवासी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.” शेतकऱ्यांनीही आता त्यांच्या शेतापर्यंत बारमाही रस्ता होईल आणि शेतमाल बाजारापर्यंत नेणे सोपे होईल अशी आशा स्थानीक ग्रामीण क्षेत्रात वयक्त केली जात आहे.








