विषारी पाण्याने वन्यप्राणी मृत्यू प्रकरणात निरपराध आदिवासींना मारहाण, घरात घुसून दहशत – खासदारांचा गंभीर आरोप
युवा मेलघाट प्रतिनिधि |
धारणी 01 जून: धारणी तालुक्यातील चौराकुंड गावात वन्यप्राणी मृत्यू प्रकरणाच्या तपासाच्या नावाखाली पोलीस आणि वनविभागाकडून स्थानिक आदिवासी नागरिकांवर अमानुष अत्याचार केल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या प्रकरणाची दखल घेत अमरावतीचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी स्वतः पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


नेमकं प्रकरण काय?
सुमारे 8 ते 10 दिवसांपूर्वी चौराकुंड परिसरातील जंगलात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यात अज्ञात व्यक्तीने विषारी पदार्थ टाकल्याने अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वनविभागाने श्री. अनिल मून कास्डेकर यांना ताब्यात घेतले. मात्र, त्यानंतर कोणताही ठोस पुरावा नसताना गावातील इतर आदिवासी कुटुंबांवर संशय घेत पोलीस व वनविभागाचे पथक गावात दाखल झाले. या पथकाने दहशत निर्माण करत घरात घुसून नागरिकांना मारहाण, शिवीगाळ केल्याचा तसेच रात्रीच्या वेळी महिलांसह कुटुंबांना घराबाहेर काढून त्रास दिल्याचा गंभीर आरोप खासदार वानखडे यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
महिला वन कर्मचाऱ्याला दगडफेक, प्रत्युत्तरात अमानुषता:
निवेदनात नमूद केल्यानुसार, गावात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत काही अज्ञात व्यक्तींकडून एका महिला वन अधिकाऱ्यावर दगडफेक झाली. ही घटना निंदनीय असली तरी, त्याचा राग गावातील निरपराध आदिवासी कुटुंबांवर काढणे चुकीचे असल्याचे खासदारांनी म्हटले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, श्री. पंतोराम सुरजलाल धिकार यांच्यासह काही नागरिकांवर दगडफेक प्रकरणात कारवाई झाली. परंतु त्याचवेळी आदिवासी महिला सौ. सरिता फालू कासवेकर व श्री. हरिचंद आमकार काजडेकर यांना काही पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण करून गैरवर्तन केल्याचे सांगण्यात आले.
खासदार वानखडे SP यांना भेटले,रोहित पटेल यांनी दिली माहिती:
या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावती येथे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेतली. यावेळी कृऊबा.समीती सभापती रोहित पटेल यांनी चौराकुंड येथील वस्तुस्थिती SP यांच्यासमोर मांडली.
“प्रशासन हे जनसामान्यांच्या सेवा आणि सुरक्षेसाठी असते. परंतु जेव्हा प्रशासन आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करते, तेव्हा सामान्य जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागतात,” अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
खासदारांची मागणी काय?
- या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी.
- दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
- पीडित आदिवासी कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा.
- भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत.
SP निकेतन कदम यांचे आश्वासन
खासदार वानखडे यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर SP निकेतन कदम यांनी या विषयाची संपूर्ण तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. “मेळघाटसारख्या आदिवासी भागात पोलीस प्रशासनाकडून जनतेला संरक्षण व न्यायाची अपेक्षा आहे, दहशत नाही,” अशी भूमिका खासदारांनी मांडली.
`मेलघाट चा सवाल:
वन्यप्राणी मृत्यू प्रकरणाचा तपास करणे आवश्यक आहे. पण त्यासाठी निरपराध आदिवासी महिलांना, वृद्धांना मारहाण करणे कितपत योग्य? दोषींवर कारवाई होईल का, की पुन्हा हे प्रकरण दाबले जाईल?










